जपानच्या धर्तीवर ओक हायस्कूलच्या विद्यार्थ्यांचा प्रयोग

महापुराने होणाऱ्या विनाशाचा अनुभव मुंबई-ठाणे परिसरातील नागरिकांनी २६ जुलैच्या अतिवृष्टीत घेतला आहे. यावेळी ठिकठिकाणी पाणी साचून राहते आणि त्यामुळे जनजीवन विस्कळीत होते. या पाण्यावर तातडीने काही प्रयोग करून त्यापासून वीजनिर्मिती किंवा हे पाणी तातडीने जमिनीखालील लाखो लिटरच्या खंदकांमध्ये साठवून ठेवले तर, नक्कीच पुरावर मात करणे शक्य होईल. त्याचबरोबर महापुरामुळे जी जीवित, वित्त हानी होते, ती टाळणे शक्य होईल. हा विचार करून, कल्याणमधील कॅप्टन र. मा. ओक हायस्कूलमधील विद्यार्थ्यांनी ‘आपत्कालीन व्यवस्थापन’ या विज्ञान प्रदर्शनात ‘महापुराच्या पाण्याचा पुनर्वापर’ हा प्रयोग सादर केला आहे.

नैसर्गिक आपत्तीपासून कुणाचीही सुटका होत नाही. नेहमीच अवघड, आव्हानात्मक परिस्थितीवर मात करण्यासाठी जपानने महापुराच्या पाण्यावर मात करण्याची यंत्रणा विकसित केली आहे.

ओक हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी जपानमधील हे तंत्रज्ञान काय आहे; हे समजण्यासाठी प्रथम माहिती महाजाल (इंटरनेट), संदर्भ ग्रंथांमधून मिळवली. त्या आधारे भारतातही पुराचे पाणी तातडीने वापरून त्यापासून कशी वीज व त्या पाण्याची साठवणूक करता येईल, हे प्रयोगाद्वारे दाखविण्याचा प्रयत्न केला आहे. हे प्रकल्प भारतात यशस्वी झाले तर, महापुराच्या पाण्यापासून होणारी जीवित, वित्त हानी टाळणे शक्य होईल, असे या विद्यार्थ्यांनी सांगितले.

ओक हायस्कूलमधील इयत्ता सातवीमधील पार्थ मांडे, श्रेयस फेगडे आणि साहिल चौबळ या विद्यार्थ्यांनी मुख्याध्यापिका मेधा कुलकर्णी, विज्ञानाचे शिक्षक संजय चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पुराच्या पाण्यावर मात करणारा प्रकल्प विज्ञान साहित्याचा आधार घेऊन तयार केला आहे.

प्रयोगाची कार्यपद्धती..

जपानमध्ये रस्त्यांच्या खाली, कडेला जमिनीखाली मोठय़ा आकाराचे खंदक खणून ठेवलेले असतात. महापूरसदृश परिस्थिती निर्माण झाली की, पुराचे पाणी या खंदकांमध्ये लोटले जाते. महापूर आला की, जपान सरकारची आपत्कालीन यंत्रणा सक्रिय होते. अतिवृष्टीमुळे जमिनीवर साठलेले पुराचे पाणी खंदकांमध्ये लोटण्याची व्यवस्था कार्यान्वित केली जाते. रस्त्याखाली खंदकामध्ये खडक, रेतीचे थर असतात. त्यामध्ये टॉपमिक्स हा पदार्थ असतो. हा पदार्थ जमिनीवरून खंदकाच्या दिशेने येणारे पाणी शोषून घेण्याचे काम करतो. एका मिनिटाला चार हजार लिटर पाणी शोषले जाते. खंदकांमध्ये गेलेले पाणी एका लंब गोलाकार विद्युत पंख्याच्या साहाय्याने वेगाने घुसळले जाते. या पाण्यापासून वीज निर्मिती केली जाते. ही वीज साठवून ठेवली जाते. विजेसाठी पाण्याचा वापर झाल्याने खंदकातील पाण्याचे प्रमाण कमी होते. वापर झालेले पाणी खंदकात तळाला राहते. भूजल पातळी वाढविण्यासाठी हे पाणी पुन्हा वापरले जाते. त्याचबरोबर साठवून ठेवलेली वीज शहरातील पथदिवे, सार्वजनिक ठिकाणच्या विजेच्या उपक्रमांसाठी वापरली जाते.

Story img Loader