अंबरनाथमधील आदिवासी संशोधकाचे पर्यावरणस्नेही यंत्र; पेटंटसाठी अर्ज
अनेकदा जवळच जलस्रोत असूनही वीज नसल्याने शेतीसाठी पाणी वापरता येत नाही. काहींना मोटरसाठीचा इंधन खर्च परवडत नाही. अंबरनाथ तालुक्यातील बदलापूरजवळील चोण गावात राहणाऱ्या रामचंद्र खोडका या आदिवासी समाजातील व्यक्तीने या समस्येवर उपाय शोधला आहे. जुजबी यांत्रिक कौशल्याच्या बळावर पाण्याच्या प्रवाहाचा वापर करून खोडका यांनी विनाइंधन पाणीउपसा करणारे यंत्र तयार केले असून, त्याद्वारे वीजनिर्मिती करणेही शक्य आहे. सध्या चोण गावाजवळून वाहणाऱ्या बारवी नदीच्या प्रवाहात त्यांनी हे यंत्र बसविले असून त्याद्वारे कोणतेही इंधन न वापरता पाणी उपसले जाते. या पर्यावरणस्नेही यंत्राच्या पेटंटसाठीही त्याने अर्ज केला आहे.
आयटीआयमधून वेल्डरचा पदविका पूर्ण केलेल्या रामचंद्र खोडका यांनी काही काळ स्वत:चा वर्कशॉप चालवून वेल्डिंगचा व्यवसाय केला. त्यानंतर राज्य परिवहनच्या कर्जत आगारात तांत्रिक कारागीर म्हणून त्यांची नेमणूक झाली. नोकरीबरोबरच चोण गावात ते शेतीही करतात. गावालगत नदी असूनही विजेअभावी त्यांना शेतीसाठी पाणी उपसून आणता येत नव्हते. डिझेलवर मोटर चालविणे परवडणारे नव्हते. त्यामुळे नदीतले पाणी कसे उपसून आणता येईल का, याचा विचार ते करू लागले. धरणामुळे बारवी नदी बारमाही वाहती आहे. प्रवाहाच्या शक्तीमुळे नदीपात्रात त्यांनी बसविलेला चार पात्याचा लोखंडी पंखा फिरतो आणि पाणी उपसले जाते. या प्रक्रियेत कुठेही वीज, डिझेल अथवा अन्य कोणतेही इंधन वापरले जात नाहीच, उलट उपसल्या जाणाऱ्या पाण्याच्या प्रवाहाद्वारे वीजनिर्मिती करणेही शक्य होते. दीड वर्षांच्या अथक प्रयत्नानंतर त्यांना हे यश आले.
साधारण पावसाळ्यानंतर शेतीत पीक घ्यायचे म्हटले तर नदीतून पाणीउपसा करण्यासाठी वीज किंवा डिझेलसाठी खर्च करावा लागतो. या यंत्राने तो खर्च पूर्णपणे वाचेल. शिवाय काही प्रमाणात वीजनिर्मिती होईल. या यंत्राची फारशी देखभाल करावी लागणार नसल्याने शेतकऱ्यांसाठी ते उपयुक्त आहे.
– रामचंद्र खोडका, चोण
विनाइंधन पाणीउपसा अन् वीजनिर्मितीही!
अनेकदा जवळच जलस्रोत असूनही वीज नसल्याने शेतीसाठी पाणी वापरता येत नाही.
Written by प्रशांत मोरे
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 06-06-2016 at 01:02 IST
Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Electricity generation in thane