कल्याण- शहापूर तालुक्याच्या ग्रामीण भागात सतत विजेचा लपंडाव सुरू आहे. बाजारपेठांमध्ये तीन ते चार तास कधी दिवसभर वीज पुरवठा बंद राहत असल्याने व्यापारी, खासगी आस्थापना, बँक अधिकारी हैराण आहेत.कडक उन्हाळ्याच्या दिवसात सुरू असलेला त्रास पाऊस सुरू झाला तरी कायम आहे. पावसाळ्यात वीज पुरवठा खंडित झाला की घरातील पंखा बंद राहतो. त्यामुळे डासांचा उपद्रव होतो. दिवसा वीज पुरवठा खंडित झाल्याने झेराॅक्स दुकाने, नागरी सेवा केंद्रातील यंत्रणा ठप्प होते. बँकेतील व्यवहार बंद राहतात. विविध अभ्यासक्रमांना प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशाची धावपळ सुरू आहे. त्यांना प्रमाणपत्र, गुणपत्रिका, इतर आवश्यक कागदपत्रांच्या झेराॅक्स काढाव्या लागतात.

काही जणांना आधार कार्ड काढायची असतात. काही जणांना आधार कार्ड मधील पत्ता बदल, मोबाईल-आधार जुळणी करायची असते. काही शाळांमधील कामे असतात. ती ही सर्व कामे ठप्प राहतात. जेवढा वीज पुरवठा बंद राहतो. त्या वेळेत दुकानात आलेला ग्राहक निघून जातो. त्यामुळे आर्थिक नुकसान होते, असे खासगी आस्थापना चालक विनोद सोनावळे यांनी सांगितले. शेतकऱ्यांना शेतीविषय सात बाराउतारा ऑनलाईन माध्यमातून सेवा केंद्रातून मिळतो. वीज पुरवठा बंद असला की शेतकऱ्यांची कुचंबणा होते.

हेही वाचा >>>डोंबिवलीत दत्तनगर भागात भुयारी गटाराचे झाकण तुटल्याने वाहन कोंडी

शहापूर तालुक्यातील शेणवे ते डोळखांब, शेणवे ते किन्हवली भागातील गाव, आदिवासी वाड्यांना खंडित वीज पुरवठ्याचा सर्वाधिक फटका बसत आहे. ग्रामीण भागातील बहुतांशी शाळा माहिती तंत्रज्ञानाने युक्त आहेत. शाळांमध्ये डिजिटल फळे, संगणक यंत्रणा आहे. वीज पुरवठा खंडित झाला की मुलांना या यंत्रणेच्या माध्यमातून शिकवता येत नाही, असे शिक्षकांनी सांगितले. स्थानिक वीज कार्यालयात अभियंते उपस्थित राहत नाहीत. क्षेत्रिय कामासाठी आम्ही बाहेर आहोत, अशी उत्तरे महावितरणचे अभियंते देतात, अशा तक्रारी ग्रामस्थांनी केल्या. स्थानिक तंत्रज्ञ वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न करतात. त्यांचे प्रयत्न तोकडे पडतात. त्यामुळे अनेक वेळा दिवसभर वीज पुरवठा खंडित राहतो.

हेही वाचा >>>डोंबिवलीत क्रेन अंगावरुन गेल्याने पाळीव श्वानाचा चिरडून मृत्यू

शहापूर ग्रामीण, डोंगराळ भागात शेतघरे आहेत. शहरी भागातील रहिवासी कुटुंबासह पावसाळी पर्यटनासाठी शेतघरांवर येतात. वीज पुरवठा नसल्याने त्यांची कुचंबणा होते. रात्रीच्या वेळेत वीज पुरवठा गेला तर डास आक्रमण करतात. अनेक रहिवासी शेतघरांवर येण्यास, रात्रीच्या वेळेत राहण्यास तयार होत नाहीत, असे श्याम पष्टे यांनी सांगितले.

Story img Loader