महावितरणच्या वीज ग्राहकांना वीज देयकाचा भरणा करणे अधिक सुलभ व्हावे यासाठी जुलै अखेर शनिवारी, रविवारी (३० व ३१ जुलै) वीज देयक भरणा केंद्र सुरु ठेवण्याचे आदेश कोकण प्रादेशिक विभागाचे सहव्यवस्थापकीय संचालक चंद्रकांत डांगे यांनी दिले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कोकण प्रादेशिक विभागातील भांडुप, कल्याण, नाशिक, रत्नागिरी जळगाव परिमंडळातील महावितरणची सर्व अधिकृत वीजबिल भरणा केंद्र शनिवार व रविवारी सुरु राहतील. त्या सोबतच थकबाकीदार वीज ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाईही या दिवशी सुरु राहणार आहे.

वीज देयक भरणा केंद्राशिवाय महावितरणच्या मोबाईल उपयोजनवर (ॲप) वर, http://www.mahadiscom.in या संकेतस्थळावर केवळ बारा अंकी ग्राहक क्रमांक नमूद करून नेट बँकिंग, डेबिट किंवा क्रेडिट कार्ड आदींच्या माध्यमातून सुरक्षित व सुलभपणे वीज देयक भरता येते. याशिवाय विविध पेमेंट वॉलेटचा (पेटीएम, गूगल पे आदी) उपयोग करून घरबसल्या वीज देयकाचा ऑनलाईन भरणा करण्याची सुविधा आहे. तसेच वीज देयकावर दिलेला क्यूआर कोड स्कॅन करूनही थेट पेमेंट गेटवेवर जाऊन वीज देयक भरता येत. अखंडित वीज सेवेसाठी उपलब्ध सुविधांचा उपयोग करून चालू व थकीत वीज देयकाचा भरणा करावा, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Electricity payment centers of mahavitran open on saturday sunday amy