डोंबिवली पश्चिमेतील सर्वाधिक लोकवस्तीच्या गरीबाचापाडा प्रभागात गे्ल्या काही दिवसांपासून विजेचा सकाळपासून दिवसभर लपंडाव सुरू राहत असल्याने रहिवासी हैराण आहेत. घरातून कार्यालयीन काम करणाऱ्यांना या लपंडावाचा सर्वाधिक फटका बसतो. शहराच्या इतर भागात वीज पुरवठा सुरळीत असताना गरीबाचापाडा भागातच विजेचा लपंडाव का, याचे उत्तर अधिकारी देत नसल्याने एक दिवस रहिवाशांचा उद्रेक होण्याची चिन्हे आहेत.

सकाळी मुलांची शाळेत जाण्याची गडबड असते. घरातील गिझरमधून आंघोळीचे गरम पाणी केले जाते. मुलांचे भोजन डबे तयार केले जातात. वीज प्रवाह खंडित असला की घरात काळोखात चाचपडत कुटुंबीयांना मुलांची तयारी करावी लागते. सकाळी पालिकेचे नळद्वारे पाणी येते. वीज प्रवाह खंडित असला की टाकीत पाणी येत नाही. दिवसभर पाण्याची वाट पाहत बसावे लागते. सकाळी कार्यालयीन कामाला सुरुवात केल्यानंतर विजेचा लंपडाव सुरू होेतो. अनेक जण विदेशी व्यवहार, कार्यालयीन कामात व्यस्त असतात. त्यांची सर्वाधिक कुचंबणा होते.दुपारच्या वेळेत वीजपुरवठा खंडित झाल्यावर घरातील पंखा, वातानुकुलित यंत्र बंद पडतात. पालिकेची पाण्याची वेळ दुपारची वेळ असते. घरात रुग्ण, ज्येष्ठ, लहान बाळे असतात. त्यांना गरमाईचा सर्वाधिक त्रास होतो.

गरीबाचापाडा, देवीचापाडा, नवापाडा, उमेशनगर भागात सतत होणाऱ्या खंडित वीज पुरवठ्यावर महावितरण अधकिकाऱ्यांनी तातडीने उपाययोजना करून हा पुरवठा खंडित होणार नाही याची दक्षता घ्यावी, अन्यथा रहिवाशांचा मोर्चा महावितरण कार्यालयावर काढण्याचे नियोजन या भागातील रहिवासी करत आहेत.

दोन पाण्याच्या टीकाजवळ बिघाड
उमेशनगर मधील दोन पाण्याच्या टाक्यांजवळील मैदाना जवळील एअर दर्शन सोसायटी जवळ महावितरणचे सयंत्र आहे. याठिकाण एक जम्प आहे. हा जम्प जुनाट आहे. तो महिनाभरात १५ वेळा तुटला. त्या तुटलेल्या जम्पला महावितरणचे अभियंते तात्पुरती जोडणी करून वीज पुरवठा सुरळीत करतात. विजेचा दाब वाढला की हा जम्प तुटतो. वीज पुरवठा खंडित होतो. याठिकाणी नवीन जम्प टाकण्याचे काम महावितरण अधिकारी हाती घेत नसल्याने गरीबाचापाडा भागाचा वीज पुरवठा सतत खंडित होत असतो असे एका माहितगाराने सांगितले. शुक्रवारी जम्प तुटल्यानंतर त्याला लावायला लग नव्हता. जुनी पुराणी साधने वापरुन ही जोडाजोडी करुन वीज पुरवठा खंडित होतो. याठिकाणी नवीन जम्प बसविण्यासाठी महावितरण अधिकाऱ्यांना स्थानिक अधिकाऱ्यांना आदेश देण्याची मागणी रहिवाशांकडून केली जाते.

कावळ्यांचा त्रास
अनेक वेळा कावळे, कबुतरे जिवंत वीज वाहिनीवर बसतात. हे पक्षी उडताना किंवा बसताना त्यांची शेपटी दोन्ही जिवंत वीज वाहिनींना एकावेळी लागते. त्यामुळे रोहित्रात बिघाड होऊन वीज पुरवठा खंडित होतो. पावसाळ्यात वीज वाहिन्यांना अनेक ठिकाणी कार्बन आलेला असतो. त्याला कसलाही स्पर्श झाला की रोहित्रात बिघाड होतो. त्यामुळे वीज पुरवठा खंडित होत असतो, अशी माहिती महावितरणच्या अधिकाऱ्याने दिली.

Story img Loader