कल्याण – महावितरणचे अधिकारी डोंबिवलीतील बेकायदा बांधकामांना नियमबाह्य वीज पुरवठा करत आहेत, असा आरोप करत निर्भय बनोच्या पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण केले. महावितरणच्या संतोषी माता रस्त्यावरील तेजश्री मुख्यालयासमोर हे उपोषण करण्यात आले.
शासन, न्यायालय बेकायदा बांधकामांविरुद्ध आक्रमक भूमिका घेत आहेत. महावितरणचे अधिकारी मात्र त्या बेकायदा इमारतीत रहिवासी राहण्यास आले आहेत. असा सहानुभूतीचा विचार करुन भूमाफियांच्या दबावाने त्या बेकायदा इमारतींना नियमबाह्य वीज पुरवठा करत आहेत. अशाप्रकारे महावितरणचे अधिकारी विशेष तपास पथक, ईडी, न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करत आहेत. त्यामुळे डोंबिवलीत बेकायदा इमारतींना नियमबाह्य वीज पुरवठा देणारे महावितरणचे अधीक्षक अभियंता दीपक पाटील यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी, अशी मागणी निर्भय बनो संस्थेचे संस्थापक महेश निंबाळकर यांनी केली आहे.
हेही वाचा – बुलढाणा : ढाब्याऐवजी पत्रकार उतरले रस्त्यावर! बावनकुळेंच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन
हेही वाचा – गोंदिया : दोघांचा मृत्यू! एक नदीत बुडाला, दुसऱ्याने तलावात उडी घेतली…
एकीकडे पालिका प्रशासन बेकायदा बांधकामांविरुद्ध आक्रमक झाले असताना, दुसरीकडे महावितरणचे अधिकारी मात्र शहरातील बेकायदा बांधकामांना वीज पुरवठा देऊन अभय देत आहेत, अशा अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे. ही कारवाई झाली नाही तर यापुढील आपले आंदोलन उग्र असेल, असे निंबाळकर यांनी सांगितले.