महावितरणाची विशेष मोहीम; गेल्या वर्षीच्या तुलनेत वीज देयकांची तिप्पट वसुली
ग्राहकांनी थकविलेले वीज देयके आणि वीजचोरी यामुळे आर्थिक कोंडीत सापडलेल्या महावितरण कंपनीने वीज चोरांवर अंकुश ठेवण्यासाठी आता कारवाईचा धडाका लावला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत महावितरणच्या भांडूप परिमंडळाने केलेल्या कारवाईत तीनपट अधिक दंड वसुली केली आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून वीज चोरी, मीटरमध्ये अफरातफरी, आकडा टाकणे, गृहवापरासाठी दिलेली वीज खासगी व्यवसायासाठी वापरणे अशा घटनांमध्ये वाढ झाली होती. त्यामुळे महावितरणचे आर्थिक नुकसान होऊ लागले आहे. या घटनांना आळा घालण्यासाठी महावितरणाच्या भांडूप विभागातील ठाणे, नवी मुंबई आणि मुंबईतील भागात २०१५ मध्ये एकूण १९ हजार ७०७ मीटरची तपासणी केली. त्यातील १ हजार ८२२ दोषींकडून ५ कोटी ७७ लाख रुपयांची वसुली करण्यात आली. तर ६६८ जणांवर गुन्हा नोंदविण्यात आला. त्यांच्याकडून १ कोटी ६९ लाखांपेक्षा जास्त वसुली करण्यात आली तर २०१६ मध्ये एकूण २७ हजार ३१५ मीटरची तपासणी करण्यात आली. त्यातील १ हजार ७१७ दोषींकडून १७ कोटी रुपयांची वसुली केली. तर ११२५ जणांवर गुन्हा दाखल केला असून त्यांच्याकडून सुमारे दीड कोटी रुपये वसूल केले. या घटनांमध्ये जे दोषी आहेत त्यांच्यावर १३५ व १३६ अंतर्गत वीज मीटरमध्ये अफरातफरी केल्याने गुन्हे दाखल आहेत.
यापूर्वीची दंडवसुली
- २०१५ मध्ये भांडुप परिमंडळात एकूण १९ हजार ७०७ मीटर तपासण्यात आले. त्यापैकी १८२२ मीटर सदोष असल्याचे आढळले. त्यांच्याकडून ५ कोटी ७७ लाख १३ हजार रुपये वसूल करण्यात आले. त्यावर्षी एकूण ६६८ गुन्हे दाखल होऊन त्यांच्याकडून एक कोटी ६९ लाख ५७ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
- २०१६ मध्ये २७ हजार ३१५ मीटर तपासण्यात आली. त्यांपैकी १ हजार ७१७ मीटर सदोष होती. त्यांच्याकडून १७ कोटी ३९ लाख ७४ हजार रुपयांचा दंड वसूल केला गेला. त्या वर्षी एक हजार १२५ गुन्हे दाखल होऊन त्यांच्याकडून १ कोटी ४७ लाख ३९ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला.
ज्या भागात वीज चोरीचे प्रमाण अधिक आहे, तेथील अधिकाऱ्यांना आम्ही कारवाईचे आदेश देणार आहोत. तसेच महावितरणकडूनही नियमितपणे अशा कारवाया करण्यात येतील. ग्राहकांनीही अनधिकृत जोडणी करून वीज वापरू नये असे आवाहन आम्ही करत आहोत.
– सतीश करपे, भांडूप नागरी परिमंडळाचे मुख्य अभियंते