ठेकेदारांच्या भल्यासाठी प्रस्ताव आणल्याचा विरोधी पक्षांचा सेना-भाजपवर आरोप
प्रदुषणमुक्त प्रवासाला चालना देण्यासाठी ठाण्यात विजेवर चालणारी बससेवा सुरू करण्याच्या पालिकेच्या निर्णयाचे स्वागत होत असताना ही सेवा ठाणे परिवहन उपक्रमाच्या वातानुकूलित बसच्या मार्गावर चालवण्याचा निर्णय घेत पालिकेने साऱ्यांनाच धक्का दिला आहे. प्रवाशांचा चांगला प्रतिसाद असलेल्या वातानुकूलित बससेवेच्या मार्गावरच ‘इलेक्ट्रिक बस’ चालवण्याची परवानगी देणारा निर्णय सत्ताधारी शिवसेना आणि भाजपने स्थायी समितीच्या बैठकीत घेतला आहे. त्यामुळे एकीकडे ठाणेकरांना ‘इलेक्ट्रिक बस’मुळे प्रदुषणमुक्त प्रवास करता येणार असला तरी, त्यासाठी वातानुकूलित बससेवेवर पाणी सोडावे लागणार असल्याचे चित्र आहे.
ठाणे परिवहन उपक्रम (टीएमटी) तोटय़ात चालला असला तरी त्याच्या वातानूकुलित बससेवेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. या बससेवेचे तिकीट दर जास्त असतानाही अशा बसच्या फेऱ्या आणि संख्या वाढवावी, अशी मागणी प्रवाशांकडून करण्यात येत आहे. असे असताना सत्ताधारी सेना-भाजपने या बससेवेवर गंडांतर आणण्याचे प्रयत्न चालवले आहेत. वातानुकूलित बसेसच्या विस्तारीकरणाचा मार्ग रोखून धरत विजेवर धावणाऱ्या बसगाडय़ांचे परिचालन करणारा खासगी ठेकेदार म्हणेल त्या मार्गावर त्यास परवानगी देण्याचा वादग्रस्त निर्णय स्थायी समिती सभेत सत्ताधारी शिवसेना आणि भाजपने घेतला आहे. खासगी ठेकेदारासाठी वातानुकूलित बसगाडय़ांचा विस्तार थांबवू नका, अशी आग्रही मागणी विरोधकांनी लावून धरली असतानाही सभापती संजय वाघुले यांनी हा प्रस्ताव बहुमताच्या जोरावर मंजूर करून घेतला.
या निर्णयाचे पडसाद शुक्रवारी सायंकाळी झालेल्या परिवहन समितीच्या बैठकीत उमटले. विजेवर चालणाऱ्या बसगाडय़ांच्या परिचालनाचा मुद्दा उपस्थित करत खासगी ठेकेदाराच्या हितासाठी वातानुकूलित बसगाडय़ांचे नफ्यात चालणारे मार्ग रद्द करण्याचा डाव आखण्यात आल्याचा आरोप काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि मनसेच्या सदस्यांनी केला. सद्य:स्थितीत टीएमटीच्या तीस वातानुकूलित बसगाडय़ांचे उत्पन्न प्रतिदिन सहा लाख रुपये आहे. विजेच्या बसेस चालविणाऱ्या ठेकेदाराने याच मार्गावर दावा सांगितला असून त्यास ते देण्याचा निर्णय स्थायी समितीने घेतला आहे. विशेष म्हणजे फायदेशीर आणि प्रवाशांना हव्या असणाऱ्या वातानुकूलित बसेच्या मार्ग विस्तारीकरण कुठे आणि कसे करणार याविषयी प्रशासनाकडून अपेक्षित खुलासा करण्यात आला नसून याविषयी बाळगले जाणारे मौन धक्कादायक असल्याचा आरोप विरोधकांनी परिवहन समिती सभेत केला. शहरातील अधिक प्रमाणात विजेवर धावणाऱ्या बसगाडय़ांचे परिचालन व्हावे. मात्र, प्रवाशांना हवे असलेल्या वातानुकूलित बसगाडय़ांचा मार्ग बंद करून ठरावीक ठेकेदाराचे चांगभलं करण्यासाठी या प्रस्तावास भाजप आणि शिवसेनेने बहुमताच्या जोरावर मंजुरी दिल्याचा आरोपही परिवहन समिती सभेत विरोधकांनी केला. या आरोपानंतरही प्रशासनाने आणि सभेला उपस्थित असलेले स्थायी समिती सभापती संजय वाघुले यांनी याविषयी मौन धारण केल्याचे चित्र होते.