लोकसत्ता विशेष प्रतिनिधी
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
ठाणे : येथील नितीन कंपनी, कॅडबरी आणि कापुरबावडी चौकातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी येथील उड्डाण पुलांना जोडून उन्नत मार्गिका तयार करण्याचा प्रस्ताव ठाणे महापालिकेने तयार केला आहे. हा प्रस्ताव ठाणे महापालिका प्रशासनाने मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडे (एमएमआरडीए) पाठविला असून त्यावर एमएमआरडीएकडून सविस्तर अभ्यास सुरू असल्याची माहिती पालिका सुत्रांनी दिली.
ठाणे शहरातून मुंबई-नाशिक महामार्ग तर घोडबंदर भागातून मुंबई-अहमदाबाद महामार्ग जातो. या मार्गांवरून दुपार आणि रात्रीच्या वेळेत मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची वाहतूक सुरू असते. शिवाय, सकाळ आणि सायंकाळच्या वेळेत नोकरदार वर्गाच्या वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ सुरू असते. यामुळे या मार्गांवर दिवसभर वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत आहे. ही समस्या सोडविण्यासाठी ठाणे महापालिका आणि वाहतूक पोलिसांनी काही वाहतूक बदल लागू केले आहेत. या बदलानुसार माजिवाडा आणि कापुरबावडी चौकातील वाहतूक वर्तुळाकार पद्धतीने करण्यात आली आहे. या बदलांमुळे काही प्रमाणात कोंडीची समस्या कमी झाल्याचे दिसून येत असले तरी पुर्णपणे ही समस्या निकाली निघू शकलेली नाही.
आणखी वाचा-ठाण्यात कचरा विल्हेवाटीची पुन्हा सक्ती
कापुरबावडी चौकात एकाच वेळी चारही बाजूने वाहने येत असल्याने कोंडीची समस्या निर्माण होत आहे. त्याचबरोबर मुंबई-नाशिक महामार्गे घोडबंदरच्या दिशेने जाणारी वाहतूकीला माजिवाडा चौकात येण्यास प्रवेश बंद केला असून ही वाहने उड्डाणपुल मार्गे कॅडबरी चौकातून घोडबंदर मार्गे वळविण्यात येतात. यासाठी उड्डाण पुलाखाली एक वळण मार्गिका तयार करण्यात आली आहे. या अवजड वाहतूकीमुळे कॅडबरी चौकाला जोडणाऱ्या रस्त्यांवर कोंडी होऊ लागली असून त्याचबरोबर नितीन कंपनी चौकातही अशीच काहीशी अवस्था आहे. यामुळे कापुरबावडी, कॅडबरी आणि नितीन कंपनी चौकातील कोंडी कमी करण्यासाठी पालिका प्रशासनाने आता उड्डाण पुलांना जोडून उन्नत मार्गिका तयार करण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. हा प्रस्ताव ठाणे महापालिका प्रशासनाने मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडे (एमएमआरडीए) पाठविला असून त्यावर एमएमआरडीएकडून सविस्तर अभ्यास सुरू असल्याची माहिती पालिका सुत्रांनी दिली.
आणखी वाचा-घोडबंदरवासियांना पाण्यासाठी वाढीव खर्चाचा भुर्दंड
अशी असेल मार्गिका
कापुरबावडी येथून ठाण्याच्या दिशेने जाणाऱ्या उड्डाण पुलाला जोडून उन्नत मार्गिका तयार करण्यात येणार असून ही मार्गिका माजिवाडा गावात जाणाऱ्या रस्त्याजवळ उतरविण्यात येणार आहे. यामुळे घोडबंदरहून कॅडबरी आणि मिनाताई ठाकरे चौकाकडे जाणारी वाहने थेट मार्गिकेवरून जातील आणि यामुळे कापुरबावडी चौकातील वाहनांचा भार कमी होऊ शकेल, असा दावा ठाणे महापालिकेकडून करण्यात येत आहे. कॅडबरी आणि नितिन कंपनी उड्डाण पुलाला जोडून उन्नत मार्गिका तयार करण्यात येणार आहे. ही मार्गिका कॅडबरी सिग्नल ओलांडून काही अंतरावर उतरविण्यात येणार आहे. अशाचप्रकारे नितीन कंपनी चौकातील मार्गिकेचे नियोजन आहे. यामुळे चौकातील वाहतूक कोंडी कमी होईल. मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या मार्गिकेवर रुंद रस्ता असल्याने याठिकाणी उन्नत मार्गिका उभारणे शक्य होईल. परंतु नाशिकच्या दिशेने जाणाऱ्या मार्गिकेवर मेट्रो मार्गिकेमुळे रस्ता अरुंद झाला असून त्याठिकाणी हि मार्गिका उभारणे शक्य होऊ शकेल का याचा अभ्यास करण्यात येत आहे, अशी माहिती पालिका सुत्रांनी दिली.