वसईतील अनेक उद्वाहनांना परवाना नाही; अनेकांची तपासणीही नाही
सुहास बिऱ्हाडे/ कल्पेश भोईर, वसई
वसईच्या सातिवली येथील एका इमारतीच्या उद्वाहनात अडकून सात वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाल्याच्या घटनेनंतर शहरातील उद्वाहनांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. शहरातील अनेक उद्वाहने अनधिकृत असून ती बसवण्यापूर्वी उद्वाहन विभागाकडून परवाना घेतला नसल्याचे दिसून येत आहे. त्याशिवाय उद्वाहन विभागाकडून उद्वाहनांची नियमित तपासणी होत नसल्याचेही आढळून आले आहे.
वाढत्या नागरीकरणामुळे वसई-विरार शहरात उंच इमारती उभ्या राहत आहेत. रहिवाशांच्या सोयीसाठी इमारतींमध्ये उद्वाहने बसवण्यात येतात. सध्या वसई-विरार शहरात तीन हजार उद्वाहने अधिकृत असल्याची माहिती उद्वाहन विभागानेच दिली. उद्वाहने बसवण्यापूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विद्युत विभागाकडून पाहणी केली जाते आणि त्यानंतर उद्वाहने वापरासाठी योग्य असल्याचा परवाना देण्यात येतो. महापालिकेच्या अग्निशमन विभागाकडून ना हरकत दाखला देण्यात येतो आणि त्यानंतर उद्वाहन बसवण्यात येते.
उद्वाहन बसवल्यानंतर त्याच्या देखभाल-दुरुस्तीचे कंत्राट संबंधित कंपनी अथवा इतर कंपनीकडे देण्यात येते. मात्र त्यांच्याकडून योग्य ती देखभाल केली जात आहे की नाही, सुरक्षेच्या नियमांची अंमलबजावणी झालेली आहे की नाही, याची तपासणी करण्याचे काम उद्वाहन विभागाचेच असते. मात्र या विभागाचे शहरातील उद्वाहनांकडे लक्ष नसल्याचे दिसून आले आहे. उद्वाहन विभागाचे मुख्य कार्यालय चेंबूर येथे आहे. तेथील उद्वाहन निरीक्षकांकडून उद्वाहनांची नियमित तपासणी केली जाते. त्यामध्ये त्याची सुरक्षा, दरवाजे, त्याची लोडिंग यांची तपासणी केली जात असते, अशी माहिती उद्वाहन निरीक्षण अधिकारी बी. के. उगले यांनी दिली. शहरातील एक हजार उद्वाहनांची दरवर्षी तपासणी केली जात असल्याचा दावा उद्वाहन अधिकाऱ्यांनी केला. म्हणजे अधिकृत तीन हजार उद्वाहने असताना केवळ एक हजार उद्वाहनांचीच तपासणी केली जात आहे. दुसरीकडे शहरात अधिकृत तीन हजार उद्वाहने असली तरी अनेक इमारतींना परवाना न घेता उद्वाहने बसवण्यात आली आहेत. आमच्याकडे जर या अनधिकृत उद्वहनांची माहिती आली तर आम्ही त्यांना नोटीस बजावतो, असे उद्वहन विभागाने सांगितले.
३००० वसई-विरारमधील अधिकृत उद्वाहने : १००० उद्वाहन विभागाकडून तपासणी २००० उद्वाहनांची तपासणी नाही
रहिवासी हतबल
शहरातील अनेक इमारतींचे उद्वाहन सुस्थितीत नाही. तक्रार कुठे करायची याची माहिती रहिवाशांना नसते. पालिका म्हणते, ते आमचे काम नाही. त्यामुळे रहिवासी हतबल होतात. शहरातील विनापरवाना असलेल्या उद्वाहनांवर कारवाई होत नसल्याने तेथील रहिवाशांच्या डोक्यावर दुर्घटनेची टांगती तलवार आहे.
दरवर्षी आमच्या विभागाच्या वतीने इमारतींत बसवण्यात आलेल्या उद्वाहनांची तपासणी केली जात असते. उद्वाहनांची तपसणी करूनच त्यांना परवाने दिले जात असतात. परवाना न घेता उद्वाहन बसवल्याची माहिती मिळाली तर संबंधितांना नोटीस देण्यात येते.
– बी. के. उगले, उद्वाहन निरीक्षण अधिकारी