ठाणे : एका आंतरराष्ट्रीय कंपनीत मोठ्या हुद्द्यावर असलेल्या नोकरदाराची ८८ लाख रुपयांना ऑनलाईन फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी कासारवडवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस याप्रकरणाचा तपास करत आहेत.
घोडबंदर भागात फसवणूक झालेला व्यक्ती त्याच्या कुटुंबासोबत वास्तव्यास आहे. २०२४ मध्ये डिसेंबर महिन्यात ते मोबाईलमध्ये फेसबुक खाते पाहत असताना, त्यांच्या फेसबुकवर शेअर बाजारासंदर्भाची एक जाहीरात दिसली. या जाहीरातीमध्ये त्यांनी प्रवेश केला असता, ते एका व्हाॅट्सॲप समूहामध्ये सहभागी झाले. या समूहामध्ये शेअर बाजारात कोणते शेअर घ्यायचे याबाबतची माहिती दिली जात होती. त्यानंतर त्यांना त्यांच्या मोबाईलमध्ये एक ॲप सामाविष्ट करण्यास सांगण्यात आले. त्या ॲपवर त्यांनी त्यांची काही माहिती सामाविष्ट केली. त्या ॲपच्या माध्यमातून त्यांनी शेअर बाजारात पैसे गुंतविण्यासाठी डिसेंबर आणि जानेवारी या दोन महिन्यात टप्प्याटप्प्याने ८८ लाख ७० हजार ३८६ रुपये जमा केले. या गुंतवणूकीच्या मोबदल्यात त्यांना दोन कोटी ७९ लाख इतकी रक्कम निव्वळ नफा ॲपमध्ये दाखविण्यात आला. परंतु त्यांनी रक्कम बँक खात्यात जमा करण्याचा प्रयत्न केला असता, त्यांना ती रक्कम जमा करता येत नव्हती. याबाबत त्यांनी संबंधित रकमेविषयी संबंधित जाहीरात देणाऱ्या महिलेला विचारली असता, तिने ४० लाख रुपये भरण्यास सांगितले. आपली फसवणूक होत असल्याचे लक्षात आल्यानंतर त्या नोकरदाराने याप्रकरणी कासारवडवली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार, गुन्हा दाखल झाला आहे.