ठाणे : घोडबंदर येथील आनंदनगर भागातील एका इमारतीमधील पाण्याची टाकी सफाई करताना बेशुद्ध पडलेल्या एका कर्मचाऱ्याचा मृत्यु झाल्याची घटना शनिवारी सायंकाळी उघडकीस आली. या कर्मचाऱ्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला असून या कर्मचाऱ्याच्या वृत्तानंतर परिसरात हळहळ व्यक्त होत होती.

अनमोल अर्जुन भोये असे मृत पावलेल्या कर्मचाऱ्याचे नाव असून तो ठाण्यातील मानपाडा येथील टिकूजीनीवाडी भागातील कोकणीपाडा भागात राहत होता. तो मे. ओम साई समर्थ टँक क्लीनर्स कंपनीचा कर्मचारी होता. घोडबंदर येथील आनंदनगर भागात टिक वूड ए १ ही तळ अधिक दहा मजली इमारत आहे. या इमारतीच्या गच्चीवरील पाण्याची टाकी साफ करण्याचे काम मे. ओम साई समर्थ टँक क्लीनर्स कंपनीला देण्यात आले होते. या कंपनीचा कर्मचारी अनमोल भोये हा शनिवारी सायंकाळी ४. ३० वाजता इमारतीच्या गच्चीवरील पाण्याची टाकी साफ करीत होता. त्यावेळी तो टाकीमध्ये बेशुद्ध होऊन पडला.

याबाबत माहिती मिळताच ठाणे आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि ठाणे अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. मे. ओम साई समर्थ टँक क्लीनर्स कंपनीचे कर्मचारी आणि अग्निशमन दलाचे जवान यांनी टाकीमध्ये बेशुद्ध अवस्थेत पडलेल्या अनमोल याला टाकी बाहेर काढले. यानंतर ठाणे आपत्ती व्यवस्थापन विभागाचे कर्मचारी आणि अग्निशामन दलाचे जवान यांच्या मदतीने त्याला रुग्णवाहिकेतून ओवळा येथील ऑस्कर हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नेले असता, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. त्याचा मृतदेह ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनाठी नेण्यात आला आहे, अशी माहिती ठाणे आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली.