लोकसत्ता खास प्रतिनिधी
कल्याण : आपले क्रेडिट कार्ड बंद होणार आहे. बंद होण्यापूर्वी आपणास त्याचे शुल्क भरणा करावे लागेल, अशी भीती एका २६ वर्षाच्या नोकरदाराला घालून दोन इसमांनी कल्याण पूर्वेतील खडेगोळवली भागात राहत असलेल्या नोकरदाराची १२ लाख ६६ हजार रूपयांची फसवणूक केली आहे.
सप्टेंबर ते ऑक्टबर २०२४ या कालावधीत हा फसवणुकीचा प्रकार घडला आहे. तक्रारदार या प्रकरणाची तक्रार दाखल करण्यास पोलीस ठाण्यात उशिरा आले. यामुळे हा गुन्हा दाखल होण्यास उशिर झाला. कोळसेवाडी पोलीस ठाण्यातील दाखल तक्रारीनुसार, तक्रारदार नोकरदार हे मुंबईतील नरिमन पॉईंट भागात एका कार्यालयात नोकरी करतात. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये संबंधित नोकरदाराला कार्यालयात असताना आणि कल्याणमधील खडेगोळवलीमधील श्रीनिवास वसाहतीमधील आपल्या घरी असताना तक्रारदाराला नेहा शर्मा आणि सिताराम सहाणी यांनी वेळोवेळी संपर्क केले.
नेहा आणि सिताराम यांनी नोकरदाराला तुमचे क्रेडिट कार्ड लवकरच बंद होणार आहे. हे कार्ड बंद होण्यापुर्वीच तुम्ही त्याचे शुल्क भरणा करा, असे सांगितले. दोन्ही इसमांच्या बोलण्यावर विश्वास ठेऊन तक्रारदाराने क्रेडिट बंद होण्याची प्रक्रिया आणि त्यावर भरावे लागणारे शुल्क याविषयीची माहिती दोन्ही भामट्या इसमांकडून घेतली. तक्रारदाराचा दोन्ही इसमांनी विश्वास संपादन केला. वेळोवेळी तक्रारदाराशी संपर्कात राहून त्यांच्याकडून शुल्क भरण्यासाठी आग्रही राहून दोन्ही इसमांनी कागदोपत्री आणि इतर आर्थिक प्रक्रिया करण्यास भाग पाडले.
कार्यालयीन विविध प्रक्रियेची कारणे देऊन नेहा शर्मा आणि सतिश सहाणी यांनी तक्रारदाराकडून आर्थिक व्यवहारासाठी त्यांचा गुप्त संकेतांक घेतला. तक्रारदाराची कागदपत्रे घेऊन दोन्ही इसमांनी तक्रारादाराच्या नावे १२ लाख ६६ हजाराचे बँक कर्ज मंजूर करून घेतले. ही रक्कम तक्रारदाराला समजून न देता दोन्ही इसमांनी ती रक्कम आपल्या बँक खात्यात वळती केली.
तक्रारदाराच्या हा सर्व फसवणुकीचा प्रकार उशिरा लक्षात आला. क्रेडिट कार्ड बंद करण्याच्या नावाखाली आपली दोन्ही इसमांनी फसवणूक केली असल्याचे निदर्शनास आल्यावर तक्रारदाराने कोळसेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार केली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश न्हायदे यांच्या मार्गदर्शनाखाली साहाय्यक पोलीस निरीक्षक डी. एम. पाटील याप्रकरणाचा तपास करत आहेत.
दर महिन्याला कल्याण, डोंबिवली परिसरात सुमारे चार ते पाच नागरिकांची वाढीव परताव्याचे आमिष दाखवून भामटे फसवणूक करत असल्याच्या घटना घडत आहेत.