ठाणे जिल्हा क्षयरोग विभागात नव्याने रुजू झालेल्या अधिकारी कडून कर्मचाऱ्यांना मानसिक त्रास तसेच वैयक्तिक कामे करुन घेतली जात असल्याचा आरोप काही कर्मचाऱ्यांकडून करण्यात आला आहे. यासंदर्भात, कर्मचाऱ्यांनी आरोग्य विभागाच्या उपसंचालकांकडे पत्राद्वारे तक्रार केली. परंतू, अद्याप यावर कोणतीही कारवाई झाली नसल्याने कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.
ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयात जिल्हा क्षयरोग विभाग आहे. या विभागाचे जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. आशा मुंजाळ आहेत. या आपल्या पदाचा गैर वापर करुन कर्मचाऱ्यांना मानसिक त्रास देत असल्याचा आरोप काही कर्मचाऱ्यांकडून करण्यात आला आहे. डॉ. आशा मुंजाळ यांनी कार्यभार स्विकारल्यापासून विभागातील कामाच्या स्वरुपात बदल झाले आहेत. त्या कर्मचाऱ्यांवर ताण टाकतात. तसेच कर्मचाऱ्यांना कार्यालयातील कामाव्यतिरिक्त वैयक्तिक स्वरुपाची कामे सांगितले जात असल्याची तक्रारी काही कर्मचाऱ्यांनी केली आहे. अनेकांना कार्यालयीन कामकाजाच्या वेळेनंतरही थांबण्यास भाग पाडले जाते, तसेच सुट्टी घेताना दबाव टाकला जात आहे. शिवाय या कार्यालयातील वर्ग ४ च्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या घरातीलही साफसफाई करण्यास सांगितले जाते, असे एका कर्मचाऱ्याने सांगितले. कर्मचाऱ्यांना होत असलेला हा त्रास वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचावा यासाठी कर्मचाऱ्यांनी पत्राद्वारे वरिष्ठ अधिकारी, आरोग्य विभागाचे उपसंचालक यांच्याकडे तक्रार केली आहे. परंतू, तक्रार करुन महिना उलटला असतानाही यावर कोणतिही कारवाई झाली नसल्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. तक्रार करुनही कोणतिही कारावई झाली नसल्यामुळे राज्य सरकारी गट ड चतुर्थ श्रेणी कर्मचारी मध्यवर्ती महासंघाच्या वतीने या विभागातील कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.
कर्मचाऱ्यांनी ज्या तक्रारी केल्या आहेत. असा कोणताही प्रकार घडलेला नाही. मी कोणत्याही कर्मचाऱ्याला चुकीची वागणूक दिलेली नाही. तसेच या संदर्भात माझे म्हणणे लेखी स्वरुपात जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी आणि आरोग्य विभागाचे उपसंचालक यांच्याकडे सादर केले आहे. मी आजारी असतानाही तब्येत सांभाळत कार्यालयीन कामकाज हाताळत आहे. तरी, सुद्धा मला जाणीवपूर्वक त्रास देत मानसिक दबावाखाली आणण्याचा प्रयत्न कार्यालयीन कर्मचारी करताना दिसत आहेत. – डॉ. आशा मुंजाळ, जिल्हा आरोग्य अधिकारी, क्षयरोग्य विभाग, ठाणे.