सागर नरेकर
‘वृक्ष फाऊंडेशन’च्या माध्यमातून अर्थार्जन
महिला सबलीकरणासाठी शासकीय योजना गरजूंपर्यंत पोहोचत नसल्याच्या तक्रारी सातत्याने पुढे येत असताना वृक्ष फाऊंडेशन या संस्थेने महिलांच्या रोजगारासाठी पुढाकार घेतला आहे. प्लास्टिक बंदी लागू झाल्याच्या पाश्र्वभूमीवर कागदी पिशव्यांच्या निर्मिती आणि विक्रीतून शेकडो महिलांना उदरनिर्वाहाचे साधन मिळवून देण्यात आले आहे.
ना नफा ना तोटा तत्त्वावर महिलांसाठी कार्य करणाऱ्या वृक्ष फाऊंडेशनच्या ज्योती तायडे यांनी मार्च २०१८ मध्ये कागदी पिशव्या तयार करण्यास सुरुवात केली. पवई चौकात रेखा ठाकूर यांच्या मदतीने सुरू झालेल्या या छोटेखानी कारखान्यात पवई चौक, विठ्ठलवाडी स्थानक परिसर आणि आसपासच्या भागांतील महिलांना रोजगार मिळाला आहे. सुरुवातीला सहा महिलांच्या साहाय्याने कागदी पिशव्या तयार करण्याचे काम सुरू झाले. त्यावेळी अवघ्या १०० किलो पिशव्या तयार केल्या जात होत्या. पुढे गरजू महिलांना घरी काम करण्यासाठी पिशव्यांसाठी कागद दिला जाऊ लागला. सध्याच्या घडीला ३०० हून अधिक महिला येथून पिशव्यांचे कागद घेऊन जातात. त्यांना प्रति पिशवी दोन रुपयांप्रमाणे वेतन दिले जाते. महिलांना किमान सहा ते आठ हजारांपर्यंत वेतन मिळत असल्याची माहिती हा कारखाना चालवणाऱ्या ज्योती तायडे यांनी दिली.
यातील बहुतेक महिला आर्थिकदृष्टय़ा दुर्बल, गरजू, झोपडपट्टीत राहणाऱ्या आणि हातावर पोट असलेल्या कुटुंबातील आहेत. त्यांच्या मदतीने वृक्ष फाऊंडेशन महिन्याला एक टनापर्यंत विविध आकाराच्या, रंगाच्या आणि रंगीत छपाई असलेल्या कागदी पिशव्या तयार करते. तर शिवणयंत्राचे प्रशिक्षण दिल्यानंतर काही महिला कापडी पिशव्याही तयार करत आहेत.
शहरात आणि राज्याच्या विविध भागांत या कागदी आणि कापडी पिशव्या पाठवल्या जातात. त्यामुळे शेकडो महिलांना हक्काचा रोजगार मिळाला आहे आणि पर्यावरण रक्षणालाही हातभार लागला आहे.
कचरा वर्गीकरण
या संस्थेने कचरा विलगीकरणाचेही काम करत महिलांना रोजगार मिळवून दिला आहे. त्यासोबतच रुग्णशय्येला खिळून असलेल्यांना सेवा देण्याचे कामही फाऊंडेशनतर्फे केले जात आहे. त्यासाठी महिलांना विशेष डॉक्टरांचे मार्गदर्शन आणि प्रशिक्षण मिळते. शिक्षण हक्क कायद्याच्या अंमलबजावणीतही फाऊंडेशन सक्रिय असून आतापर्यंत चार हजार मुलांना शाळेत प्रवेश मिळवून दिल्याचेही ज्योती तायडे यांनी सांगितले.