ठाणे: ठाणे जिल्हा सहकारी गृहनिर्माण महासंघातर्फे रोजगाराची संधी उपलब्ध करुन देण्यात आली आहे. गृहनिर्माण महासंघाच्या वतीने गृहनिर्माण संस्था व्यवस्थापन अभ्यासक्रम प्रशिक्षण वर्ग सुरु करण्यात आले आहेत. यावर्षी दोन तुकड्यांमध्ये या अभ्यासक्रमाचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. हे प्रशिक्षण पुर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना गृहनिर्माण संस्थामध्ये व्यवस्थापकाची नोकरी उपलब्ध होते, असे गृहनिर्माण महासंघाचे अध्यक्ष सीताराम राणे यांनी सांगितले.
सहकार आयुक्त यांनी दिलेल्या सूचनांनुसार गृहनिर्माण संस्थेमध्ये सहकार कायदा, नियम, उपविधी यासंदर्भात संपूर्ण माहिती असणाऱ्या व्यवस्थापकाची नेमणुक करणे अनिवार्य आहे. त्या अनुषंगाने ठाणे जिल्हा सहकारी गृहनिर्माण महासंघातर्फे बारावी उत्तीर्ण असणाऱ्या उमेदवारांसाठी ३२ सत्रांमध्ये गृहनिर्माण संस्था व्यवस्थापन अभ्यासक्रम प्रशिक्षण वर्ग सुरु करण्यात आले आहेत. या प्रशिक्षणाची पहिली तुकडी पुर्ण झाली आहे. जानेवारी २०२४ पासून सुरु होणाऱ्या पुढील तुकडी करिता नाव नोंदणी सुरु झाली आहे.
हेही वाचा >>> कल्याणमधील जीवनदीप महाविद्यालयात रानभाजी पाककृती उत्सव
हेही वाचा >>> ठाणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांची रोजच्या ४०० रुपयांच्या मजुरीमुळे भातशेतीकडे पाठ
प्रथम वर्ष आणि द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी देखील विशेष वर्ग सुरू करण्यात आले आहेत. हे प्रशिक्षण पुर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना गृहनिर्माण महासंघातर्फे व्यवस्थापकाची नोकरी उपलब्ध करून दिली जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. उमेदवारांना शुल्क बँकेतून शैक्षणिक कर्जरूपाने भरण्याची व्यवस्था देखील करण्यात आली असून शैक्षणिक कर्ज उमेदवारांना नोकरी लागल्यानंतर परतफेड करता येणार आहे. उमेदवारांना अधिक माहितीसाठी ९३२०३३२२८६, ९३२३३३२२८६ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन ठाणे जिल्हा सहकारी गृहनिर्माण महासंघातर्फे करण्यात आले आहे.