घरातील मतिमंद मुलाल जादूटोणा, तंत्रमंत्र धर्मविद्येचा वापर करुन बरा करतो. असे आमीष एका महिलेला दाखवून मतिमंद मुलाला बरे करण्याच्या नावाखाली महिलेची पाच लाखाहून अधिक रकमेची फसवणूक करणाऱ्या एका भोंदूबाबाल बाजारपेठ पोलिसांनी बुधवारी ठाण्यातून अटक केली आहे. मोहम्मद आसिफ मोहम्मद आरिफ हिंगोरा (३७, रा. घोडबंदर, गायमख, ठाणे) असे अटक केलेल्या भोंदुबाबाचे नाव आहे. या भोंदु बाबाने आतापर्यंत किती जणांची फसवणूक केली आहे. याचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे.
पोलिसांनी सांगितले, कल्याण पश्चिमेतील कोळीवाडा भागात नवाज इमारतीमध्ये आरिफा मुलानी (२९) ही आपल्या कुटुंबासह राहते. आरिफा यांचा छोटा दीर मतिमंद आहे. तो ठीक होण्यासाठी मुलानी कुटुंब विविध प्रकारचे उपचार त्याच्यावर करतात. गेल्या वर्षी अशाच प्रकारचे उपचार शोधत असताना आरिफा हिची ओळख ठाण्याचा भोंदू बाबा मोहम्मद याच्या बरोबर झाली. आरिफानाने मोहम्मदला मतिमंद दिराविषयी माहिती दिली. त्याला ठीक करण्यासाठी काय करता येईल याविषयी मार्गदर्शन घेतले.
भोंदूबाबा मोहम्मदने मतिमंद मुलाची परिस्थिती पाहून त्याला आपण ठीक करतो. त्यासाठी काही खर्च येईल तो करावा लागेल असे आरिफाला सांगितले. दीर ठीक होणार असल्याने होणारा खर्च करण्याची तयारी आरिफाने दर्शविली. मोहम्मद मागेत ती रक्कम जादू – टोण्यासाठी ती त्याला देत होती. मोहम्मद आरिफा हिच्या घरी घरात अंगारा धुपारा करुन तंत्रमंत्र विदयेचे वातावरण निर्माण करत होता. काही महिने त्याचा हा कार्यक्रम सुरू होता. या कालावधीत मोहम्मदने आरिफाकडून पाच लाख ३९ हजार रुपये उकळले होते. एवढा खर्च करुनही मतिमंद मुलगा बरा होत नाही म्हणून आरिफाने मोहम्मदकडे विचारणा केली. तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला. तो लवकरच ठीक होईल असे साचेबध्द उत्तर तो देत होता. दीराच्या प्रकृतीत कोणतीही सुधारणा होत नसल्याने मोहम्मदने आपली फसवणूक केली म्हणून आरिफा मुलानी हिने बाजारपेठ पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. त्यानंतर मोहम्मद फरार झाला होता. पोलिसांनी अंधश्रध्दा निर्मूलन कायद्याने गुन्हा दाखल करुन त्याचा तपास सुरू केला होता. गेल्या सात महिन्यापासून पोलीस त्याच्या मागावर होते.
मोहम्मद जादुटोण्याची माहिती एकाला देण्यासाठी ठाण्यातील तीन हात नाका परिसरात येणार आहे. अशी गुप्त माहिती बाजारपेठ पोलिसांनी मिळाली होती. पोलिसांनी बुधवारी या भागात सापळा लावला होता. ठरल्या वेळेत मोहम्मद तेथे येताच पोलिसांनी त्याला अटक केली. मोहम्मद हा वर्धा जिल्ह्यातील मूळ रहिवासी आहे. तो १४ वर्षापासून ठाण्यातील घोडबंदर गायमुख भागात कुटुंबासह राहतो.