बदलापूरः बदलापूर शहरात फेरिवाले आणि खाद्यपदार्थांच्या वाढत्या संख्येला आता सर्वसामान्य नागरिक कंटाळले आहेत. या फेरिवाल्यांच्या गाड्यांवर कारवाई होत नसल्याने बदलापुरात एका नागरिकाने थेट अग्नीशमन दलाला दुरध्वनी करत आग लागल्याची खोटी माहिती देत त्यांना घटनास्थळी पाचारण केले. त्यानंतर अग्नीशमन दलाचे वाहन अडवून चायनीज विक्रेत्यांच्या गाड्यांवर कारवाई केल्याशिवाय जाऊ देणार नाही म्हणत गोंधळ घातला. या गोंधळानंतर या व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बदलापूर शहरात हातगाडीवरून फळे, भाजी आणि इतर वस्तूंची विक्री करणाऱ्या फेरिवाल्यांची संख्या वाढली आहे. स्थानक परिसरात आधीच रिक्षा, जीपच्या थांब्यांमध्ये या विक्रेत्यांची संख्या मोठी आहे. स्थानक परिसरात चायनीज आणि इतर खाद्यपदार्थ विक्रेत्यांची मोठी गर्दी असते. यामुळे स्थानिक दुकानदारांना मोठा त्रास सहन करावा लागतो. त्यात होणारी पार्कींगमुळे कोंडी वाढते. त्याचा पादचारी आणि स्थानिक रहिवाशांनाही फटका बसतो. पालिका प्रशासन मात्र या फेरिवाल्यांवर कारवाई करण्याबाबत उदासिन आहे. त्यामुळे नागरिकांच्या संतापाचा उद्रेक होण्याची शक्यता आहे. बदलापुरात बुधवारी नागरिकाच्या संतापाचा कडेलोट झाल्याने एक नाट्यमय घटना घडली.
हेही वाचा >>> मुंबई-नाशिक-आग्रा महामार्गावर अपघातांमध्ये वाढ, दोन वर्षात तब्बल इतक्या मृत्यूंची नोंद
बुधवारी सायंकाी ५ वाजण्याच्या सुमारास बदलापूर पश्चिमेतील बाजारपेठ परिसरात खाऊ गल्लीत दिवाकर शेट्टी या व्यक्तीने कुळगाव बदलापूर नगरपालिकेच्या अग्निशमन दलाला दूरध्वनीवरून आग लागल्याची खोटी माहिती दिली. त्यानुसार अग्निशमन दलाचे फायरमन विनायक पाटील आणि सहकारी घटनास्थळी पोहचले. त्यावेळी तेथे आग लागली नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे ते परत जाऊ लागले. त्यावेळी दूरध्वनी करणाऱ्या दिवाकर शेट्टी यांनी अग्निशमन दलाच्या गाडीपुढे आपली कार उभी करून अग्निशमन दलाची गाडी सुमारे तासभर अडवून ठेवली.
हेही वाचा >>> ठाकरे गटाला धक्का, कल्याण मध्ये ठाकरे समर्थक शिंदे गटात सामील
जोपर्यंत येथील चायनीजच्या गाड्या हटवत नाही तोपर्यंत अग्नीशमन वाहन जाऊ देणार नाही असा पवित्रा घेत अग्निशमन कर्मचाऱ्यांच्या अंगावर धावून येत त्यांना दमदाटी केली. अखेर त्यांची समजूत काढत वाहन बाहेर काढण्यात आले. याप्रकरणी बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्यात शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अग्नीशमन अधिकारी भागवत सोनोने यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या वृत्ताला दुजोरा दिला. या घटनेनंतर शहरातील फेरिवाले आणि खाद्यपदार्थ विक्रेत्यांच्या गाड्यांच्या अतिक्रमणाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. यावर तातडीने कारवाई करण्याची मागणी होते आहे.