मातीभरावामुळे पाणी वाहून जाण्याचे मार्ग बंद; पावसाळय़ा पुराचा धोका कायम
प्रसेनजीत इंगळे, लोकसत्ता
विरार : पावसाळय़ात पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी नैसर्गिक नाले महत्त्वाची भूमिका बजावतात. मात्र वसई-विरार शहरातील अनेक नैसर्गिक नाल्यांवर अतिक्रमणे करण्यात आली आहेत. भूमाफियांनी या नैसर्गिक नाल्यांचा कब्जा करून बांधकामांचा सपाटा लावला आहे. यामुळे काही ठिकाणी नाले नष्ट झाले आहेत, तर काही ठिकाणी ते अरुंद झाले आहेत. पाण्याचा निचरा होण्याचे मार्गच नष्ट होत असल्याने पुन्हा पावसाळय़ात शहर पाण्याखाली जाण्याची भीती आहे.
गेल्या काही वर्षांपासून वसईकरांना पुराचा सामना करावा लागत आहे. पुरामुळे वसईकरांचे जनजीवन विस्कळीत होत आहे. मात्र पालिका प्रशासन यावर काहीच उपाययोजना करत नाही. उलट शहरातील नैसर्गिक नाल्यांवरच अतिक्रमण होत असून पालिकेचे याकडे दुर्लक्ष झालेले आहे, असा आरोप पर्यावरण कार्यकर्ते चरण भट यांनी केला.
वारंवार तक्रार करूनही अतिक्रमणे पाडली जात नाहीत. अतिक्रमण करणाऱ्यांवर कोणत्याही प्रकारची कारवाई होत नाही, तसेच त्यांची चौकशीही होत नाही, अतिक्रमणे हटविण्यास कोणतेही प्रयत्न केल्याचे दिसून येत नाही. त्यामुळे परिसराचा मूळचा आकृतीबंध नष्ट होऊन पाणी जाण्याचे नैसर्गिक मार्ग बंद होत आहेत. यामुळे गेल्या काही वर्षांपासून वसईकरांना पुराचा सामना करावा लागत आहे. ‘निरी’ या समितीनेही नाल्यांवरील अतिक्रमण हटवण्याच्या सूचना केल्या होत्या. मात्र अद्यापही या संदर्भात कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही.
या नाल्यांवर अतिक्रमण
* वसईच्या पूर्वपट्टीत औद्योगिक वसाहतीतील नाल्यांमध्ये भराव करून कारखान्यांची जागा वाढवण्यात आली आहे.
* नालासोपारा पश्चिमेतील यशवंत गौरव परिसरातील नैसर्गिक नाला पूर्णपणे नष्ट करण्यात आला आहे. त्यावर इमारती उभारल्या आहेत. त्यामुळे पावसाच्या पाण्याला झिरपण्यासाठी तसेच त्याच्या प्रवाहासाठी जागाच उरलेली नाही.
* विरार पश्चिमेतील यशवंतनगरमध्ये नाल्याची वाट बदलली आहे. त्यावर मोठय़ा प्रमाणत भराव करून मैदान तयार करण्यात आले आहे.
* चिंचोटी येथे नैसर्गिक नाल्याच्या बाजूला भराव करून औद्योगिक गाळे तयार करून नाला अरुंद करण्यात आला आहे.
* विरार पूर्वेला फुलपाडा परिसरातील चोरघे वाडी येथील नाल्यावर भराव करून चक्क इमारती उभ्या करण्यात आल्या आहेत.
आम्ही याप्रकरणी पाहणी करण्याचे आदेश सबंधित प्रभागाला दिले आहेत. तसेच या संदर्भात अहवाल मागवण्यात आले आहेत. त्यानंतर महापालिका योग्य ती कारवाई करेल.
– रमेश मनाळे, अतिरिक्त आयुक्त, वसई-विरार महापालिका