संदीप आचार्य
ठाणे रेल्वे स्थानकापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या आरोग्य विभागाच्या ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालयाच्या आवारातील अतिक्रमणांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. रुग्णालय प्रशासनाने या अतिक्रमणांवर कारवाई करण्यासाठी ठाणे जिल्हाधिकारी व ठाणे महापालिका आयुक्तांना अनेक पत्रे लिहिली असली तरी राजकीय दबावामुळे येथील अतिक्रमणांवर कोणतीही कारवाई होत नसल्याचे रुग्णालयातील सूत्रांचे म्हणणे आहे. गंभीर बाब म्हणजे मनोरुग्णालयातील अतिक्रमण काढण्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे सुस्पष्ट आदेश असतानाही कोणतीही ठोस कारवाई केली जात नाही.
गेल्या दशकात देशात व महाराष्ट्रात मानसिक आजाराच्या रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. शाळेत जाणारी लहान मुले, महाविद्यालयीन तरुण, बेरोजगार, महिला तसेच वृद्धांमधील मानसिक ताणतणाव वाढत असून यातूनच मानसिक आजाराचे रुग्ण वाढत आहेत. अशा रुग्णांच्या उपचारासाठी व्यवस्था वाढवणे हे शासनाचे प्रमुख कर्तव्य आहे. यासाठी मनोरुग्णालयांचा विकास व संख्या वाढवणे अत्यावश्यक असून याबाबत केंद्र शासनाच्या आरोग्य विभागाअंतर्गत मानसिक आरोग्य विषयक अहवालात सुस्पष्ट भूमिका मांडण्यात आली आहे. ‘लॅन्सेट’मधील एका अहवालानुसार महाराष्ट्रात एक लाख लोकांमागे सुमारे चार हजार व्यक्ती या नैराश्यग्रस्त वा चिंताग्रस्त विकाराच्या आहेत. ‘नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो’च्या अहवालानुसार महाराष्ट्रातील आत्महत्यांचा दर हा राष्ट्रीय सरासरीपेक्षा जास्त आहे. महाराष्ट्रात दर लाख लोकांमध्ये १६.१ हे आत्महत्येचे प्रमाण आहे.
या पार्श्वभूमीवर राज्यातील मनोरुग्णालयांचा विकास होण्याची आवश्यकता असताना मनोरुग्णालयांच्या जागा हडपण्याचे राजकीय डावपेच खेळले जात आहेत. राज्यात ठाणे, पुणे, नागपूर व रत्नागिरी अशा चार ठिकाणी शासकीय मनोरुग्णालये असून ती ब्रिटिश काळात बांधण्यात आली आहेत. पुणे मनोरुग्णालयात २५४० खाटा तर ठाणे १८५० खाटा, नागपूर ९५० खाटा व रत्नागिरी येथे ३६५ खाटा अशा एकूण ५६९५ खाटांची क्षमता असून तेवढ्याच रुग्णांची भरती करणे शक्य आहे.
शासनाच्या चारही मनोरुग्णालयांची परिस्थिती भीषण म्हणावी अशी आहे. रुग्णालयातील बहुतेक इमारती जुन्या व मोडकळीला आलेल्या आहेत. आजच्या गरजेनुसार त्यात अनेक बदल करण्याची आवश्यकता आहे. प्रामुख्याने ठाणे मनोरुग्णालय नव्याने बांधण्याची नितांत गरज आहे तर पुणे येथील मनोरुग्णालयात प्रचंड सुधारणा होणे गरजेचे आहे. ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालयाची अंदाजे जागा ७२ एकर असून यातील मनोरुग्णालयाच्या ताब्यात सध्या ५३.४३ एकर जागा आहे. ८.४२ एकर जागेवर अतिक्रमण ( झोपडपट्टी) आहे तर साडेपाच एकर जागा जिल्हाधिकाऱ्यांनी सात संस्थांना जागा दिली आहे. मनोरुग्णालयाच्या एकूण १०० इमारती आहेत. रुग्णालयात एकूण १८५० रुग्ण खाटा असून यात पुरुष रुग्णांसाठी १४ तर स्त्री रुग्णांसाठी १५ इमारती आहेत. यापैकी १४ इमारती शासनानेच अतिधोकादायक जाहीर केल्यामुळे येथील रुग्णांची अन्यत्र व्यवस्था करावी लागली आहे. तीन इमारती पाडाव्या लागल्या आहेत. याचा विचार करता रुग्णांसाठी अत्यावश्यक असलेल्या व ठाणे रेल्वे स्थानकाजवळ असलेल्या या रुग्णालयाचा विकास करणे अत्यंत गरजेचे बनले असताना नियोजित रेल्वे स्थानकासाठी मनोरुग्णालयाची १४.८३ एकर जागा ठाणे महापालिकेला हस्तांतरित करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला. या हस्तांतरण व विस्तारित ठाणे रेल्वे स्थानक उभारणीच्या दृष्टीने सध्या युद्धपातळीवर काम सुरु आहे. मात्र जिल्हाधिकारी व ठाणे महापालिका आयुक्त रुग्णालयाच्या आवारातील वाढत्या अतिक्रमणांबाबत मौनीबाबा बनून असल्याचे आरोग्य विभागाच्या डॉक्टरांचे म्हणणे आहे. मनोरुग्णालयाच्या अधीक्षकांनी जिल्हाधिकारी व आयुक्तांना अतिक्रमणे काढण्यासाठी अनेकदा पत्रे दिली आहेत. मात्र कोणतीही ठोस कारवाई या दोन्ही यंत्रणांकडून केली जात नाही. ठाणे मनोरुग्णालयाच्या जागेवर ९९६ झोपड्या असून त्यापैकी ७६७ पात्र झोपड्या आहेत. याठिकाणी नव्याने अनेक झोपड्या व अतिक्रमणे उभी राहात आहेत तर वर्षानुवर्षे आवारातच राहणाऱ्या निवासी कर्मचाऱ्यांकडूनही मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाल्याचे आरोग्य विभागाच्या सूत्रांचे म्हणणे आहे. याशिवाय काही लोकप्रतिनिधींच्या दबावातून उद्यानाच्या नावाखाली मनोरुग्णालयाची जागा हडप करण्यात आली असून ही अतिक्रमणे काढणे तसेच सपूर्ण जमिनीची योग्य मोजमापणी करण्यासाठी रुग्णालय प्रशासनाकडून जिल्हाधिकारी व ठाणे पालिका आयुक्तांना वेळोवेळी पत्रे पाठविण्यात आल्यानंतरही कोणतीही ठोस कारवाई करण्यात येत नसल्याचे रुग्णालयातील सूत्रांचे म्हणणे आहे.
मनोरुग्णालयाची एकूण जागा ही ७२ एकर असून त्यापैकी १४.८३ एकर जागा विस्तारित रेव्वे स्थानकासाठी ठाणे पालिकेला हस्तांतरित करण्यात आली असून पाच एकर जागेवर जिल्हाधिकाऱ्यांनी स्वयंसेवी संस्थांना जागा दिली आहे. सुमारे दहा एकर जागेवर अतिक्रमण असून उद्यानाच्या नावाखाली काही जागा हडप करण्यात आल्याचे आरोग्य विभागाच्या सूत्रांचे म्हणणे आहे. परिणामी ठाणे मनोरुग्णालयाच्या ताब्यात आजघडीला अंदाजे ४० एकर जागा असल्याचे चित्र आहे. या जागेवर बंगलोरच्या निम्हान्स संस्थेच्या धर्तीवर मनोरुग्णालय उभारण्याबाबत आरोग्य विभाग आग्रही असून अर्थसंकल्पात ६७५ कोटी रुपयांची तरतूदही ठेवण्यात आली आहे.
ठाणे मनोरुग्णालयात बाह्यरुग्ण विभागात वर्षाकाठी ३९ हजार ६५ रुग्णांची तपासणी व उपचार केले जातात तर ५५० पुरुष व ३६२ महिला असे एकूण ९१२ रुग्ण सध्या दाखल आहेत. आजघडीला १८५० खाटांची क्षमता असून नवीन रुग्णालय उभारणीसाठी शासनाकडे अंतिम मंजुरीसाठी असलेल्या आराखड्यानुसार ३५०० खाटा असतील. साधारणपणे ३३ एकरमध्ये दोन टप्प्यात रुग्णालयाचे बांधकाम करण्याची योजना असून एकूण बांधकाम एक लाख १२ हजार ७४५.६६ चौरस मीटर एवढे करण्यात येणार आहे. यात प्रशासकीय इमारत, महिला व पुरुष वॉर्ड, वसतीगृह, कर्मचारी व अधिकारी निवासी व्यवस्था, क्षयरोग रुग्ण वॉर्ड इमारत, गुन्हेगार रुग्ण वॉर्ड इमारत, प्रशिक्षणार्थी मुले व मुलींसाठी वसतीगृह इमारत, हाफ वे होम इमारत अशी रचना असणार आहे. मनोरुग्णालय व विस्तारित रेल्वेस्थानक हे दोन्ही प्रकल्प मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत.
अतिक्रमण काढणे अत्यावश्यक…
ठाणे मनोरुग्णालयातील अतिक्रमण काढणे आवश्यक असून यात लक्ष घालून हे अतिक्रमण काढले जाईल.लवकरात लवकर ठाणे मनोरुग्णालयाचा आराख़डा मंजूर होऊन रुग्णालयाचे काम सुरु होईल. राज्य सरकारच्या उच्च स्तरीय समितीने रुग्णालय उभारणीला मान्यता दिली आहे. तसेच अर्थसंकल्पात यासाठी ६७५ कोटी रुपयांची तरतूदही करण्यात आली आहे.
मिलिंद म्हैसकर, अतिरिक्त मुख्य सचिव आरोग्य