ठाणे : करोनामुळे लागू करण्यात आलेल्या टाळेबंदीच्या काळात कोलशेत खाडी जवळील कोलशेत- बाळकूम जलवाहिनी मार्गालगत असलेल्या खारफुटींवर भराव टाकून भूमाफियांनी मोठय़ाप्रमाणात अतिक्रमण केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. येथील खारफुटी नष्ट करून त्याठिकाणी माती आणि राडारोडय़ाचा भराव टाकून ढाबे आणि उपहारगृह थाटण्याचा दावा पर्यावरणवादी संघटनांकडून केला जात आहे.
या तक्रारीनंतर ठाणे महापालिका, वन विभाग तसेच महसूल विभागाने या भागाचे मंगळवारी सर्वेक्षण केले आहे. या सर्वेक्षणाचा अहवाल येत्या काही दिवसांत वन विभागाकडून सादर केला जाणार आहे. या अहवालातून या भागात किती ठिकाणी खारफुटी नष्ट झालेली आहे. हे स्पष्ट होणार आहे.
दोन वर्षांपूर्वी करोना टाळेबंदीच्या अनेक सरकारी कार्यालये बंद होती. ठाणे महापालिकेची यंत्रणा करोना प्रादुर्भाव रोखण्याच्या कामात व्यस्त होती. त्याचाच फायदा घेऊन भूमाफियांनी बेकायदा बांधकामे उभी केली. त्यात ठाणे खाडीकिनारी भागातील तसेच मुंब्रा- दिवा खाडी किनारी भागातील खारफुटी नष्ट करून अतिक्रमण केल्याचा प्रकार काही दिवसांपूर्वीच उघडकीस आला होता. अशाचप्रकारे कोलशेत भागात खारफुटीवर अतिक्रमण करण्यात आल्याची बाब समोर आली आहे.
कोलशेत- बाळकुम येथे खाडीलगत असलेल्या मुंबई महापालिकेच्या जलवाहिनीजवळ मोठय़ाप्रमाणात खारफुटी होती. टाळेबंदीच्या काळात भूमाफियांनी येथील खारफुटी नष्ट करून त्यावर ढाबे, छोटे उपहारगृह तयार केले आहेत. तसेच काहींनी जमिनीवर भराव टाकून ठेवला आहे. याबाबत ठाण्यातील म्युज फाऊंडेशनने ठाणे महापालिकेकडे तक्रार दिली होती. या तक्रारीनंतर ठाणे महापालिकेने याठिकाणी पाहणी केली होती. तसेच डम्परद्वारे याठिकाणी राडारोडा टाकून भराव केला जात असल्यामुळे पालिकेने याठिकाणी मार्ग रोधक बसविले होते. परंतु भूमाफियांनी हे अडथळेही तोडून टाकले आहेत.
म्युज फाऊंडेशनने याप्रकरणाचा पाठपुरावा केल्यानंतर जिल्हा कांदळवन कक्षाने महापालिकेला पुन्हा या भागाची पाहणी करण्याची सूचना केली होती. त्यानुसार, मंगळवारी ठाणे महापालिका, वन विभागाचे कांदळवन कक्ष आणि महसूल विभागाने या ठिकाणी सर्वेक्षण करून सर्व बांधकामांची माहिती घेतली आहे. येत्या काही दिवसांत वन विभागाकडून त्याचा अहवाल महापालिकेस सादर केला जाणार आहे. त्यानुसार पुढील कारवाई केली जाणार असल्याची माहिती एका अधिकाऱ्याने दिली.
यापूर्वीही तक्रार
गेल्या दोन वर्षांमध्ये कोलशेत-बाळकूम येथील जलवाहिनीच्या मार्गालगत मोठय़ाप्रमाणात खारफुटी नष्ट झालेली होती. याबाबत संघटनेने महापालिकेकडे तक्रार केली होती. मंगळवारी या जागेचे सर्वेक्षण करण्यात आले. प्रशासनाने तात्काळ अहवाल सादर करून भूमाफियांविरोधात कारवाई करावी, असे म्युज फाऊंडेशनच्या पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा