अंबरनाथः कल्याण आणि अंबरनाथ तालुक्याच्या वेशीवर रस्ते, मेट्रो, नवनवी गृहसंकुले तसेच औद्योगिक वसाहती उभारल्या जात असतानाच याच तालुक्यात जाणाऱ्या काटई – अंबरनाथ मार्गालगत नेवाळी ते खोणी दरम्यान अनधिकृत चाळींची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढल्याचे समोर आले आहे.
या चाळींसाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या जलवाहिन्यांतून चोरून पाणी घेतले जाते असा आरोप आहे. नियोजन नसल्याने सांडपाणी आणि कचऱ्या व्यवस्थापनाचे तीनतेरा वाजल्याचे चित्र दिसते. धक्कादायक म्हणजे या चाळींवर कोणतीही कारवाई होत नसल्याने दिवसेंदिंवस त्यांची संख्या वाढते आहे.
एकीकडे कल्याण डोंबिवली महापालिकेचा भाग आणि दुसरीकडे भारतीय वायू सेनेची जागा या दरम्यान असलेल्या मोकळ्या जागा गेल्या काही वर्षात अनधिकृत चाळींनी गिळंकृत केल्याचे दिसून आले आहे. काटई – अंबरनाथ मार्गावरून प्रवास करताना खोणीपासून डाव्या बाजूला नेवाळी चौक आणि त्यापुढेही चाळींनी व्यापलेला मोठा भाग दृष्टीस पडतो. २०१० पर्यंत हा संपूर्ण भाग मोकळा असल्याचे गुगल चित्रांवरून स्पष्ट होते. २०११ पासून या भागात चाळींच्या उभारणीला सुरूवात झाली. सुरूवातीला स्थानिकांच्या मालकीच्या जागेत चाळींची उभारणी झाली. मात्र त्यानंतर येथे चाळी उभारण्याचा सपाटाच लावण्यात आला. त्यामुळे सध्याच्या घडीला शेकडो चाळींमध्ये हजारो नागरिक येथे वास्तव्यास आहेत. गुगल चित्रांच्या आधारे पाहिल्यास २०११ ते २०२४ या तेरा वर्षांच्या काळात येथे चाळींची संख्या शेकडोवर पोहोचली आहे. अगदी दाटीवाटीत येथे चाळी उभ्या करण्यात आल्या आहेत. यात काही उत्तर भारतीय बांधकाम व्यावसायिकांचाही समावेश आहे.
शेकडो चाळींमध्ये राहणारे रहिवासी बहुतांश उत्तर भारतीय असल्याची माहिती स्थानिकांनी दिली आहे. येथून काटई मार्गाजवळून महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची बारवी जलवाहिनी जाते. याच जलवाहिनीला छिद्र पाडून येथील रहिवाशांना पाणी पुरवठा केला जातो असा आरोप सातत्याने होतो आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे अधिकारी येथील वाहन धुलाई दुकानांवर कारवाई करत आपली पाठ थोपटून घेत असले तरी या पाणीचोरीकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप होतो. परिणामी प्रामाणिकपणे कर भरणाऱ्या नागरिकांना कमी दाबाने पाणी पुरवठा होतो आहे. या चाळींची सांडपाणी आणि कचरा व्यवस्था नसल्याने रस्त्याच्या किनारी कचऱ्यांचे ढीग पहायला मिळतात.
गुन्हेगारीचेही केंद्र ?
गेल्या काही महिन्यात झालेल्या कारवाईत याच भागातील चाळींमधून काही बांगलादेशींनी अटक केली गेली आहे. तसेच परराज्यातील अनेक पोलीस येथून आरोपींना पकडून नेत असल्याचीही माहिती आहे. त्यामुळे या अनधिकृत चाळी गुन्हेगारीचे केंद्र बनत असल्याचे बोलले जाते.
कारवाईस टाळाटाळ
या अनधिकृत चाळींवर कारवाई करणार कोण असा प्रश्न उपस्थित होतो आहे. ज्या जागेवर चाळी आहेत त्यातील काही जागा भारतीय वायू सेनेच्या अखत्यारित येते. तर काही जागा वन विभागाची आहे. जिल्हा प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याने चाळ माफियांचे फावत असून रहिवाशांनी फसवून होते आहे. भविष्यात ही अतिक्रमणे हटवणे कठीण होण्याची भीती येथील स्थानिक व्यक्त करतात.