कल्याण पूर्वेत कोळसेवाडी, वालधुनी नदी, बाजारपेठ विभाग रस्ते, पदपथ अडवून फेरीवाले, व्यापाऱ्यांनी उभारलेली बेकायदा अतिक्रमणे जे प्रभागाच्या कारवाई पथकाने जमीनदोस्त केली. या अतिक्रमणांमुळे पादचाऱ्यांना रस्ते, पदपथावरून चालणे अवघड झाले होते. याविषयीच्या तक्रारी वाढल्याने जे प्रभागाच्या पथकाने ही कारवाई केली.
आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर नागरिकांच्या तक्रारींचे तात्काळ निवारण करा. पदपथ, रस्त्यांना अडथळे ठरणारी सर्व बेकायदा बांधकामे, निवारे, टपऱ्या तोडण्याचे आदेश प्रभाग साहाय्यक आयुक्तांना दिले आहेत. या आदेशाप्रमाणे जे प्रभागाच्या साहाय्यक आयुक्त हेमा मुंबरकर यांनी लोकग्राम, कोळसेवाडी, कचोरे, नेतिवली, जुनी जनता बँक, वालधुनी नदी परिसर, कल्याण पूर्व रेल्वे स्थानक परिसरातील बाजारपेठ विभागात फेरीवाला हटाव पथकाचे प्रमुख मिलिंद शिंदे, के. पी. बारिया, पोलीस यांच्या बंदोबस्तात रस्ते, पदपथ आणि दोन इमारतींचा आधार घेऊन बांधलेले गाळे, टपऱ्या जेसीबीच्या साह्याने जमीनदोस्त केल्या. या कारवाईमुळे परिसरातील रहिवाशांनी समाधान व्यक्त केले.
या बेकायदा टपऱ्या, निवाऱ्यांमुळे पदपथावरून चालता येत नव्हते. रस्त्यावर वाहन कोंडी होत होती. फेरीवाल्यांच्या पाणीपुरी, भेळपुरीच्या हातगाड्या जप्त करण्यात आल्या. काही जागीच तोडून टाकण्यात आल्या. पदपथांवरील २० हून अधिक निवारे, १५ टपऱ्या तोडण्यात आल्या, अशी माहिती साहाय्यक आयुक्त हेमा मुंबरकर यांनी दिली.
प्रभागात एकही बेकायदा टपरी, निवारा, रस्त्यावर हातगाडी दिसणार नाही यासाठी दररोज प्रभागात फेरीवाला हटाव पथकाच्या माध्यमातून पाहणी करण्यास सुरुवात केली आहे. नागरिकांना पदपथ चालण्यासाठी मोकळे राहतील यादृष्टीने काळजी घेतली जात आहे. अशाप्रकारची कारवाई नियमित केली जाणार आहे. – हेमा मुंबरकर ,साहाय्यक आयुक्त ,जे प्रभाग, कल्याण