बदलापूरः सोमवारी कुळगाव बदलापूर नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांनी सुरू केलेली अतिक्रमण हटाव मोहिम बुधवारीही सुरू होती. पूर्वेत कारवाई केल्यानंतर बुधवारी बदलापूर पश्चिमेतील रेल्वे स्थानक परिसर, खाऊ गल्ली, बाजारपेठ परिसरात पालिकेच्या वतीने अतिक्रमण कारवाई करण्यात आली. टपऱ्या, हातगाड्यांसह रस्त्यात अडथळे निर्माण करणारा राडारोडासुद्धा पालिकेने यावेळी हटवला. यामुळे स्थानक परिसर मोकळा झाल्याचे चित्र होते.

गेल्या काही महिन्यात बदलापूर शहरात रस्त्यांवर अतिक्रमणे वाढली होती. अनेक दुकानदारांनी पदपथावर आपल्या दुकानाचे साहित्य मांडून पदपथ गिळंकृत केले होते. दुकानाकडे येणाऱ्या रस्त्यावर लोखंडी जाळ्या, सिमेंटचे ठोकळे टाकून रस्त्याचा काही भागही अनेक दुकानदारांनी अडवला होता. त्याचा गैरफायदा घेत त्याच ठिकाणी अनेक फेरिवाल्यांनी बस्तान मांडले होते. त्यामुळे सायंकाळच्या सुमारास बदलापूर पश्चिमेतील रेल्वे स्थानक परिसर कोंडीत अडकत होता.

पदपथावर दुकानदारांचे अतिक्रमण, उरलेल्या रस्त्याच्या कडेला फेरिवाले आणि खाद्यपदार्थ विक्रेते यांचे बस्तान होते. त्यामुळे पादचाऱ्यांना रेल्वेतून घरी जाण्यासाठी मोठी कसरत करावी लागत होती. त्यातच सायंकाळच्या सुमारास भाजी आणि फळ विक्रेते थेट रस्त्यावर येऊन विक्री करत होते. त्यामुळे बाजारपेठ परिसर कोंडीत अडकत होता. त्यामुळे यावर कारवाई करण्याची मागणी गेल्या अनेक दिवसांपासून होती. त्यानुसार बुधवारी कुळगाव बदलापूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी मारूती गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली अतिक्रमण विरोधी विभागाकडून सकाळपासून स्थानक परिसरात कारवाई सुरू करण्यात आली. यावेळी रस्त्यावर आणि पदपथावर बेकायदा पद्धतीने उभ्या केलेल्या हातगाड्या, दुकाने, लोखंडी जाळ्या हटवण्यात आल्या. खाऊ गल्लीत, वैशाली सिनेमागृह, पुढे स्थानक आणि बाजारपेठ परिसरात अतिक्रमण हटवण्यात आले. या कारवाईनंतर नागरिकांकडून समाधान व्यक्त होत होते.

पूर्वेतही धडक कारवाई

दोनच दिवसांपूर्वी कुळगाव बदलापूर नगरपालिकेने बदलापूर पूर्व भागात घोरपडे चौक, कात्रप चौक, जुना पेट्रोल पंप चौक, अंबरनाथ रस्ता, शिरगाव भागातील अतिक्रमणांवर कारवाई करण्यात आली. रस्त्यावर खाद्यपदार्थ विक्रेत्यांनाही या कारवाईत दणका बसला. ही कारवाई सातत्याने व्हावी अशी मागणी या कारवाईनंतर होते आहे.

Story img Loader