आशीष धनगर
बसथांबा गाठण्यासाठी प्रवाशांना द्राविडी प्राणायाम
ठाणे रेल्वे स्थानकात कल्याणच्या दिशेला बांधण्यात आलेला पादचारी पूल आणि सॅटिसचा पूल एकमेकांना न जोडल्यामुळे बस प्रवाशांची गैरसोय होत आहे. टीएमटीचे बसथांबे सॅटिसवर असल्यामुळे या पुलावरून ये-जा करणाऱ्यांना बसथांबा गाठण्यासाठी द्राविडी प्राणायाम कारावा लागत आहे. एकमेकांपासून अवघ्या दीड फुटांवर असलेल्या या पुलांची जोडणी तांत्रिक कारणांमुळे रखडल्याची सबब रेल्वे प्रशासन पुढे करत आहे.
परळ रेल्वे स्थानकातील पादचारी पुलावर झालेल्या चेंगराचेंगरीनंतर खडबडून जाग्या झालेल्या रेल्वे प्रशासनानेरखडलेल्या पादचारी पुलांचे काम हाती घेतले. त्यासाठी एक स्वतंत्र समिती स्थापन करण्यात आली. मध्य रेल्वेच्या महत्त्वाच्या स्थानकांतील पादचारी पुलांची संख्येत टप्प्याटप्प्याने वाढ झाल्याचे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले. याच कालावधीत ठाणे रेल्वे स्थानकात कल्याण दिशेकडील नव्या पादचारी पुलाचे बांधकाम सुरू होते. गेल्या वर्षी त्याचे खासदार राजन विचारे यांच्या हस्ते मोठय़ा दिमाखात लोकार्पण करण्यात आले. पुलामुळे स्थानकातील गर्दीचे योग्य व्यवस्थापन होईल, अशी आशाही या वेळी व्यक्त करण्यात आली होती, मात्र हा पूल होऊनही प्रवाशांच्या पदरी निराशाच पडली, अशी प्रवासी संघटनांची तक्रार आहे.
नवा पादचारी पूल फलाट क्रमांक दोन ते दहाला जोडण्यात आला आहे. पुलावर फलाट क्रमांक तीन, चार, पाच आणि सहावर जाण्यासाठी उद्वाहनांची सोयही आहे. मात्र ठाणे स्थानकातून सॅटिसवर बस पकडण्यासाठी जाणाऱ्या प्रवाशांसाठी हा पूल गैरसोयीचा ठरत आहे. उद्वाहनामुळे या पुलाचा वापर करणे सुकर झाले असले, तरी बस थांब्याच्या दिशेने जाण्यासाठी नवा पादचारी पूल उतरून दुसरा पादचारी पूल चढावा लागतो. यात वेळ तर जातोच, शिवाय दमछाकही होते. त्यामुळे पादचारी पूल लवकरात लवकर सॅटिसच्या पुलाला जोडण्यात यावा, अशी मागणी करण्यात येत आहे.
कल्याण दिशेकडील पूल आणि पश्चिमेकडचा सॅटिसचा पूल यामध्ये अवघे दीड फूट अंतर आहे. त्यामुळे सॅटिसवर जाण्यासाठी द्राविडी प्राणायाम करावा लागतो. रेल्वेही याकडे दुर्लक्ष करत आहे.
– विनायक थत्ते, रेल्वे प्रवासी
कल्याण दिशेकडील रेल्वे पादचारी पूल सॅटिसला जोडणे शक्य आहे का याची पडताळणी केली जाईल. त्यानंतरच या पुलाच्या जोडणीच्या कामाची पुढील दिशा ठरवण्यात येईल.
– राजेंद्र कुमार वर्मा, स्थानक संचालक, ठाणे