बदलापूर: शनिवारी कामाहून परतणाऱ्या नोकरदारांना लोकल खोळंब्याचा फटका बसला. अंबरनाथ आणि बदलापूरच्या स्थानकादरम्यान मालगाडीचे इंजिन बंद पडल्याने त्यामागे लोकल गाड्या खोळंबल्या. आधीच पावसामुळे धीम्या गतीने सुरू असलेल्या लोकल गाड्यांमुळे प्रवासी संतप्त होते. त्यातच अंबरनाथहून पुढे लोकल गाड्या जात नसल्याने प्रवाशांना त्याचा नाहक त्रास सहन करावा लागला.
हेही वाचा – ठाणे जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला, खड्डे आणि पाणी साचल्यामुळे वाहतुकीचा वेग मंदावला
शनिवारी सायंकाळी साडेआठ ते नऊच्या दरम्यान अंबरनाथहून बदलापूरच्या दिशेने जाणाऱ्या मालगाडीच्या इंजिनात बिघाड झाला. त्यामुळे बदलापूर आणि कर्जतकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. एक लोकल अंबरनाथ स्थानकात खोळंबली. तर त्यामागे लोकल गाड्यांच्या रांगा लागल्या. उल्हासनगर विठ्ठलवाडी स्थानकातून अंबरनाथ स्थानकात येण्यासाठी प्रवाशांनी पर्यायी मार्ग स्वीकारला. तर काही प्रवाशांनी चालतच उल्हासनगर आणि अंबरनाथ स्थानक गाठले. त्यामुळे शनिवारी घरी परतणाऱ्या प्रवाशांना त्रास सहन करावा लागला. आधीच वरून कोसळणारा पाऊस त्यात लोकल खोळंब्यामुळे प्रवाशांच्या संतापात आणखी भर पडली. बदलापूर वांगणी कर्जत आणि खोपोलीच्या दिशेने जाणाऱ्या प्रवाशांचा यामुळे खोळंबा झाला.