डोंबिवली- डोंबिवलीतून कोल्हापूर ये्थे इंजिनीअरचे शिक्षण घेण्यासाठी गेलेल्या एका १९ वर्षाच्या विद्यार्थ्याला आपल्या जाळ्यात ओढून त्याला कोल्हापूरच्या तीन इसमांनी शेतघरावर नेले. तेथे त्या तरुणाला शीतपेयातून गुंगीचे औषध देऊन त्याची एका महिलेसोबत अश्लिल छायाचित्रे काढण्यात आली. ही छायाचित्रे आम्ही समाज माध्यमात प्रसारित करतो अशा धमक्या देऊन तीन इसमांनी या तरुणाकडून दोन वर्षात ३० लाख रुपयांचा सोन्याचा ऐवज वसूल केला आहे.
हा सततचा प्रकार असह्य झाल्याने तरुणाने कुटुंबीयांना घडला प्रकार सांगितला. त्यानंतर हे प्रकरण उजेडात आले आहे. डोंबिवलीतील गोग्रासवाडी भागात राहणारा १९ वर्षाचा तरुण कोल्हापूर येथे इंजिनीअरिंगचे शिक्षण घेण्यासाठी गेला आहे. एका उद्योजकाचा हा मुलगा असल्याचे पोलिसांनी सांगितले. कोल्हापूर येथे शिक्षण घेत असताना दोन वर्षाच्या काळात या तरुणाची ओळख सागर बबसिंग रजपूत (२२, रा. दतवाड, इचलकरंजी, कोल्हापूर), शुभम बाळकृष्ण जाधव (रा. कावळा नाका, कोल्हापूर), रोहन संघराज (रा. कावळानाका) यांच्या बरोबर झाली होती. या तिन्ही आरोपींनी तरुणाला आपल्या शेतघरावर मेजवानी करण्यासाठी गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात नेले होते. तेथे त्याला तिन्ही आरोपींनी शीतपेयातून गुंगीचे औषध दिले. या मेजवानीच्यावेळी एक महिला तेथे उपस्थित होती. या महिले सोबत या तरुणाचे अश्लिल छायाचित्रे आरोपींनी काढली. शुध्दीत आल्यावर ते विद्यार्थ्याला ती छायाचित्रे दाखवू लागले. ही छायाचित्रे आम्ही समाज माध्यमावर प्रसारित करणार आहोत अशी धमकी देऊन ते विद्यार्थ्याकडून पैसे, सोन्याची मागणी करू लागले. ही मागणी पूर्ण केली नाहीतर त्याला ठार मारण्याची धमकी देऊ लागले. ही छायाचित्रे प्रसारित झाली तर आपली बदनामी होईल म्हणून तरुण त्यांना ती प्रसारित न करण्याची विनंती करत होता. या बदल्यात आरोपी तरुणाकडून सोन्याचा ऐवज वसूल करत होते. दोन वर्षाच्या काळात आरोपींनी तरुणाकडून सुमारे ८०० ग्रॅम सोन्याचा ऐवज असा एकूण ३० लाख रुपयांचा हस्त ऐवज वसूल केला आहे.
आरोपींच्या सततच्या मागणीला कंटाळून तरुणाने घरी हा प्रकार सांगितला. त्यानंतर टिळकनगर पोलीस ठाण्यात याप्रकरणी तीन आरोपींच्या विरुध्द तक्रार करण्यात आली. पोलिसांनी गुन्हा दाखल करुन आरोपींचा तपास सुरू केला आहे.