ठाणे : ठाण्यात मेट्रो निर्माणाचे काम घोडबंदर भागात सुरू आहे. या सर्वेक्षणासाठी गेलेल्या अभियंत्यांना कावेसर भागात धक्काबुक्की आणि मारहाण झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी कासारवडवली पोलीस ठाण्यात सहा जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. ठाण्यातील घोडबंदर भागात मेट्रो निर्माणाचे काम सुरू आहे. ही मेट्रो वडाळा-घाटकोपर- घोडबंदर येथील कासारवडवली- अशी वाहतुक करणार आहे.

कासारवडवलीपुढे गायमुख पर्यंत या मेट्रोचा विस्तार करण्यात आला आहे. मेट्रोचे बांधकाम, सर्वेक्षण असा वेगवेगळ्या कंपन्यांना याचा ठेका देण्यात आला आहे. घोडबंदर भागात काही ठिकाणी मेट्रोचे खांब उभारले गेले आहेत. तर काही ठिकाणी गर्डर बसविण्याचे काम सुरू आहे. मागील सहा ते सात वर्षांपासून सुरू असलेल्या या कामांमुळे घोडबंदरच्या मार्गिका अरुंद झाल्या आहेत. त्यामुळे नागरिकांना येथे वाहतुक कोंडीचा फटका बसत असतो. या मेट्रोसाठी घोडबंदर भागात सर्वेक्षण सुरू असते.

सोमवारी महामेट्रोचा ठेका मिळालेले कंपनीचे सहा अभियंते कावेसर येथील तारांगण इमारतीजवळ सर्वेक्षण करत होते. सोमवारी सायंकाळी पाच वाजता सर्वेक्षण सुरू असताना, मोठ्याप्रमाणात येथे जमाव जमला होता. या जमावातील सहाजण पुढे येऊन ही जमीन आमची आहे येथे सर्वेक्षण करु नका असे अभियंत्यांना सांगू लागले. त्यानंतर त्यांनी यातील काही अभियंत्यांना धक्काबुक्की करत मारहाण केली. तसेच सर्वेक्षणाची यंत्रणा देखील तोडली. हे यंत्र शेतकऱ्यांच्या जमीनीवर सर्वेक्षण करताना आमच्याकडूनच तुटले असेही त्या अभियंत्यांकडून एका कागदावर लिहून घेण्यात आले. काही वेळानंतर जमाव तेथून निघून गेला. त्यानंतर तेथे कासारवडवली पोलीस ठाण्याचे कर्मचारी आले. अभियंत्यांना कासारवडवली पोलीस ठाण्यात नेऊन तक्रार दाखल करण्यात आली आहे. याप्रकरणी आता कासारवडवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

Story img Loader