कल्याण : कल्याण येथील केंब्रिया इंटरनॅशनल स्कूल आणि महाविद्यालयातर्फे आयोजित सायन्स कार्निव्हलला विद्यार्थी पालकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. रोबोटिक्स, स्टेम प्रोजेक्ट, हायड्रोफोनिक्स, थ्री डी प्रिंटिंग असे विषय घेऊन हे कार्निव्हल भरविण्यात आले होते.
मुलांना हसत खेळत विज्ञानाची ओळख व्हावी. जागतिक पातळीवर विज्ञान, माहिती तंत्रज्ञान, कुत्रिम बुध्दिमतेचा होत असलेला विविध स्तरांवरील वापर, त्याचा उपयोग आणि प्रगतीची माहिती ओळख विद्यार्थी, पालकांना एका व्यासपीठावर व्हावी, या उद्देशाने हा उपक्रम आयोजित केला होता, असे केंब्रिया इंटरनॅशनल शाळेच्या संचालिका मीनल पोटे यांनी सांगितले.
इयत्ता पहिले ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी आपली कौशल्ये वापरुन विविध प्रयोगांचे सादरीकरण कार्निव्हलमध्ये केले होते. सौर दिवा, विद्युत सायकल, रोबोटिक्स, स्वयंचलित उपकरणे आणि कार्य, स्वयंचलित कार, सौर उर्जेवर धावणारी, विद्युत कार आणि त्यामुळे कमी होणारे प्रदूषण असे ५० हून अधिक विषय विद्यार्थ्यांनी प्रयोगातून मांडले होते. विद्र्यार्थी, पालक, विज्ञानप्रेमी नागरिक या उपक्रमात सहभागी झाले होते, असे पोटे ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक बीपिन पोटे यांनी सांगितले.
हेही वाचा >>> डोंबिवलीत अर्धवेळ नोकरीचे आमिष दाखवून सात जणांची १९ लाखांची फसवणूक
येणाऱ्या काळात विज्ञान, तंत्रज्ञानात होणारी प्रगती, त्यामधील आपले भवितव्य याची ओळख शालेय जीवनापासून विद्यार्थ्यांना व्हावी म्हणून असे उपक्रम राबविण्याला आम्ही प्राधान्य देत आहोत, असे संचालिका मीनल पोटे यांनी सांगितले. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी प्राचार्या हिना फाळके, भूषण कुटे, अमोल शिंदे, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मेहनत घेतली.