लघुउद्योजकांची संघटना असलेली टिसा आणि कोसिआचे संस्थापक डाॅ. मधुसूदन (अप्पासाहेब) खांबेटे (९२) यांचे शुक्रवारी सकाळी ११.३० वाजताच्या वृद्धापकाळाने निधन झाले. ते जनी जनार्दन सेवा समितीचे अध्यक्ष होते. त्यांच्या पश्चात मुलगा, सून, नातवंडे, जावई असा परिवार आहे. डाॅ. खांबेटे यांचे पार्थिव अंतिम दर्शनासाठी शनिवारी सकाळी ७.३० ते ११.३० यावेळेत वागळे इस्टेट येथील ‘टिसा हाऊस’मध्ये ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर दुपारी १ वाजता ठाण्यातील जवाहरबाग स्मशानात त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.
हेही वाचा >>>कल्याण: टिटवाळा-मांडा मधील ४७ रहिवाशांवर वीज चोरीप्रकरणी फौजदारी कारवाई
रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील अंजर्ले या गावात डाॅ. मधुसूदन खांबेटे यांचा ३० मे १९३१ यावर्षी जन्म झाला होता. त्यांचे वडिल कोलकाता येथील एका कंपनीत कामाला असल्याने त्यांचे सुरुवातीचे शिक्षण हे कोलकाता येथे झाले. त्यामुळे मराठी, इंग्रजी आणि हिंदी या भाषेव्यतिरिक्त ते गुजराती आणि बंगाली भाषाही अस्खलितपणे बोलत. दुसऱ्या महायुद्धात कोलकातामध्ये झालेल्या बाँब हल्लानंतर ते नागपूरला त्यांच्या नातेवाईकांसोबत वास्तव्यास आले. तिथे त्यांनी दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले होते. शाळेत त्यांनी क्रिडा संघांचेही नेतृत्त्व केले. इंटरमिजिएट विज्ञान शिक्षण पूर्ण केल्यानंतर ते पुन्हा कोलकाता येथे गेले. त्यानंतर त्यांनी एका कारखान्यात आठवड्यातून चार दिवस काम करून आणि दोन दिवस महाविद्यालयात हजेरी लावून इलेक्ट्रीकल आणि मेकॅनिकल अभियांत्रिक या दोन्ही पदविका घेतल्या होत्या. वयाच्या ३२ व्या वर्षी त्यांनी मित्रांसोबत मे.एस्केजी इंजिनीअर्स नावाने छोटे युनीट सुरू करून उद्योजकतेची मुहूर्तमेढ कोलकत्त्यात रोवली.
हेही वाचा >>>बदलापूरः स्थानक परिसरातील गाळ्यांवर धडक कारवाई, पालिकेने जमिनदोस्त केले ३५ अनधिकृत गाळे
उद्योगाला सुगीचे दिवस त्यानंतर ते आई-वडिलांसह ठाण्यात वास्तव्यास आले. आशियातील सर्वात मोठ्या वागळे इंडस्ट्रियल इस्टेट येथे राज्य वित्तीय महामंडळाकडून कर्ज घेतलेल्या दीड लाख रुपये आणि १५ हजार रुपये उसनवार घेऊन ५०० चौरस मीटर भूखंड खरेदी केला. १९६९ मध्ये मे. रामसन इंजिनिअर्स या नावाने कंपनी सुरू केली. ते कंपनीत सुमारे १८ तास राबत होते. ५० जणांना रोजगार देणे हे त्यांचे लक्ष्य होते.त्यांनी १९७४ मध्ये ४ ते ५ लघु उद्योजकांना सोबत घेऊन ठाणे स्माॅल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशनची (टिसा) स्थापना केली. या संस्थेची वास्तू असावी यासाठी औद्योगिक विकास महामंडळाकडे एक हजार चौ, मी. मोफत जागेची मागणी त्यांनी केली. परंतु एमआयडीसीने २५० रुपये प्रति. चौ. मी. दराने पैसे भरण्यास सांगितले. खांबेटे यांनी उद्योजकांची भूमिका मांडल्यानंतर १९८३ मध्ये एक रुपया चौ.मी. दराने टिसाला ही जागा देण्यात आली.
हेही वाचा >>>ऑलिम्पिक दर्जाचा तरणतलाव आता अंबरनाथमध्ये; पालिकेकडून बांधकामाची निविदा जाहीर, खेळाडूंना अंबरनाथमध्ये मिळणार सुविधा
ठाणे जिल्ह्यात उद्योगवाढ होण्यासाठी तसेच रोजगार निर्मितीसाठी टिसाचे मोठे योगदान आहे. टिसामुळे ठाण्यात पहिली लघु उद्योग परिषद भरली होती. या परिषदेस तत्कालीन मंत्री जाॅर्ज फर्नांडिस, सुशीलकुमार शिंदे, भाऊसाहेब हिरे उपस्थित होते. जिल्हा आणि राज्यातील उद्योजकांचे राष्ट्रीय स्तरावरील प्रश्न सोडविण्यासाठी राष्ट्रीय संस्था असणे आवश्यक होते. त्यामुळे १९९० मध्ये लघु उद्योजकांची राष्ट्रीय शिखर संस्था चेंबर ऑफ स्माॅल इंडस्ट्री असोसिएशनची (कोसिआ) स्थापना झाली. कोसिआच्या माध्यमातून चीन आणि सेनेगल येथे उद्योजकांच्या शिष्टमंडळाचे नेतृत्त्व खांबेटे यांनी केले होते. २०१२ ते २०१४ या कालावधीत केंद्र सरकारच्या लघु उद्यो मंत्रालयांतर्गत असणाऱ्या राष्ट्रीय लघु उद्योग मंडळावर कोसिआच्या माध्यमातून खांबेटे यांची निवड झाली होती. वस्तू आणि सेवा कर लागू करण्यापूर्वी जकात तसेच वेगवेगळ्या १७ प्रकारचे कर आणि त्यानंतर आलेला स्थानिक संस्था कर रद्द करण्यासाठी खांबेटे यांनी मोठे आंदोलन उभे केले होते.