डोंबिवली – डोंबिवली औद्योगिक विभागात एमआयडीसीकडून काँक्रिट रस्ते बांधणीची कामे सुरू आहेत. ही रस्ते कामे करताना खोदकाम करताना जेसीबी चालकाकडून कंपन्यांना पाणी पुरवठा करणाऱ्या जलवाहिन्या फोडण्यात येत असल्याने उद्योजकांच्या उत्पादनावर परिणाम होत आहे.
ही रस्ते कामे दीर्घकालीन लाभाची असली तरी आता कामे सुरू असताना ठेकेदाराच्या जेसीबी चालकाकडून ढिसाळपणे खोदाकाम केले जात असल्याने जलवाहिन्या फुटून उद्योजकांना त्याचा मोठा फटका बसत आहे, असे येथील एमआयडीसीतील उद्योजकांनी सांगितले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कंपनीसमोर काँक्रिटीकरणाचे काम सुरू होण्यापूर्वी रस्ते खोदकाम करणाऱ्या जेसीबी चालकाला कंपनीला पाणी पुरवठा करणाऱ्या जलवाहिन्या कोणत्या आहेत. तेथे हळू काम कर. असे सांगूनही जेसीबी चालक उद्योजकाची पाठ फिरताच निष्काळजीपणे काम करून जलवाहिन्या फोडून टाकत आहेत. जलवाहिन्या फोडल्या की त्यामधून शेकडो लीटर पाणी फुकट जाते. तेवढे पाणी उत्पादनासाठी न मिळाल्याने कंपनीतील उत्पादनावर त्याचा परिणाम होतो, असे उद्योजकांनी सांगितले.

हेही वाचा – Acid Attack: कल्याणमध्ये मोटारमधून प्रवाशांनी ॲसिड फेकल्याने पादचारी जखमी

जलवाहिनी फुटली की त्याची माहिती एमआयडीसीतील पाणी पुरवठा विभागातील तंत्रज्ञांना दिली की ते येऊन नवीन वाहिनी खरेदी करणे, ती पुन्हा मुख्य जलवाहिनीला जोडून पाणी पुरवठा पूर्ववत करण्यासाठी सुमारे १० ते १५ हजार रुपये शुल्क घेतात. पाण्याशिवाय उत्पादन निघत नसल्याने पैशाचा विचार न करता बहुतांशी उद्योजकांनी अशाप्रकारे शुल्क देऊन कामे करून घेतली आहेत. एकेका उद्योजकाच्या दोन ते तीन वेळा जलवाहिन्या जेसीबीमुळे फुटल्या आहेत. त्यांना त्याप्रमाणे दोन ते तीन वेळा खर्च आला आहे. त्याची फिकीर कोणीही एमआयडीसी अधिकारी, ठेकेदार, जेसीबी चालक करत नसल्याने उद्योजक संतप्त आहेत. मोठ्या उद्योजकांची कामे झटपट आणि त्यांना मुबलक पाणी पुरवठा होईल याची काळजी एमआयडीसीचे कामगार घेतात.

हेही वाचा – १२ डबे लोकलच्या नवीन थांब्यामुळे कल्याण, डोंबिवली स्थानकात प्रवाशांची तारांबळ

काँक्रिटीकरणाची कामे अनेक वर्षांनंतर होत असल्याने त्यात अडथळा नको म्हणून कोणी उद्योजक या रस्ते कामाविषयी तक्रार करण्यास पुढाकार घेत नाही. त्याचा अधिकाधिक त्रास वाढू लागल्याने याप्रकरणी प्रसंगी एमआयडीसीच्या वरिष्ठांकडे तक्रार केली जाईल, असे उद्योजकांनी सांगितले.
कल्याण, डोंबिवलीत अनेक ठिकाणी रस्ते काँक्रिटीकरणाची कामे सुरू आहेत. तेथे कोठेही जेसीबी चालकाकडून जलवाहिन्या फोडण्याचे प्रकार होत नाहीत. मग एमआयडीसीमध्ये हे प्रकार दररोज का घडत आहेत. निवासी विभागात तर गेल्या दोन महिन्यांत १८ वेळा जलवाहिन्या फुटण्याचे प्रकार घडले आहेत. याचा फटका सोसायटीतील रहिवासी, बंगले मालक यांना बसत आहे. अनेक रहिवासी पाणी टंचाईमुळे दोन ते तीन हजार रुपये खासगी टँकरसाठी मोजून सोसायटीतील रहिवाशांची पाण्याची तहान भागवत आहेत. काँक्रिटीकरणाचे रस्ते दीर्घकालीन फायद्याचे असल्याने सध्या आम्ही हा त्रास सहन करत आहोत, असे उद्योजकांनी सांगितले.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Entrepreneurs in dombivli midc worried due to continuous bursting of water pipes ssb