कॅसलमील येथील मिनाताई ठाकरे चौक उड्डाणपूलावरून ठाण्याच्या दिशेने वाहतूक करणाऱ्या मार्गिकेवर शुक्रवारी काँक्रिटीकरणाचे काम केले जाणार आहे. त्यामुळे उड्डाणपूलावरून कोर्टनाका, खोपटच्या दिशेने वाहतूकीस प्रवेशबंदी करण्यात आली असून येथील वाहतूक उड्डाणपूलाखालून सोडण्यात येणार आहे. या वाहतूक बदलामुळे गोकूळनगर, कॅसलमिल परिसरात वाहतूक कोंडी होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. शुक्रवारी सकाळी १० ते काम संपेपर्यंत हे वाहतूक बदल लागू असतील.
हेही वाचा >>>डोंबिवलीत कचरा वेचणाऱ्या महिलेचा मंगळसूत्रावर डल्ला
ठाण्यात मिनाताई ठाकरे चौकातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी एमएमआरडीएने उड्डाणपूल बांधला आहे. पूलाच्या देखभाल दुरुस्तीचे काम ठाणे महापालिकेकडून केले जाते. पावसाळ्यात या उड्डाणपूलावरील गोकूळनगर येथील पोहोच रस्त्यावर मोठ्याप्रमाणात खड्डे पडले आहेत. या रस्त्याच्या क्राँक्रिटीकरणाचे काम शुक्रवारी सकाळी केले जाणार आहे. त्यामुळे ठाणे पोलिसांनी या मार्गावर वाहतूक बदल लागू केले आहेत. उड्डाणपूलाखालील मार्ग अत्यंत अरुंद असल्याने कोंडीची शक्यता व्यक्त केली जात आहे.
हेही वाचा >>>कोपर-भिवंडी रेल्वे मार्गात आढळला तरुण-तरुणीचा मृतदेह; अपघात की आत्महत्या, तपास सुरु
असे आहेत वाहतूक बदल
प्रवेश बंद – गोकूळनगर येथून मिनाताई ठाकरे चौक उड्डाणपुलावरून कोर्टनाका आणि खोपटच्या दिशेने वाहतूक करणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना गोकूळनगर उड्डाणपूल येथे प्रवेश बंद करण्यात येत आहे.
पर्यायी मार्ग – ही वाहने गोकुळनगर येथून उड्डाणपूलाखालून मिनाताई ठाकरे चौक मार्गे इच्छित स्थळी जातील.