कुंडीतली झाडं आपण एक आवड म्हणून लोवतो. पण हीच आवड आपल्यातल्या सर्जनशीलतेला वाव देते आणि गृहवाटिका एक कलाकृती बनते. स्वत:ला मिळणारा विरंगुळा, घराला येणारी प्रसन्नता, वनस्पतींची औषध म्हणून तसच स्वयंपाकात उपयुक्तता, हवा शुद्ध करणारी यंत्रणा अशा अनेक फायद्यांव्यतिरिक्त गृहवाटिका मुलांच्या शालेय अभ्यासासाठी उपयुक्त झाली तर आणखीनच छान.
शालेय अभ्यासक्रमातील पुस्तकांमधे वेगवेगळ्या संदर्भात झाडांची, फुलांची, फळांची नावे येतात. मुलांनी ती झाडं, फुलं, फळं पाहिलेली असतील तर पुस्तकातला संदर्भ समजण्यास त्यांना सोपं जातं. बरेच वेळा फळ बघितलेलं असतं पण त्याच झाड बघितलेलं नसतं. फूल बघितलेलं असतं पण ते फूल झाडाला येतं की वेलीला हे माहिती नसते किंवा एखादं मोठं झाड-वृक्ष बघितलेला असतो, पण त्याची फुलं, फळ बघितलेली नसतात. यासाठी जी झाडांची, फुलांची, फळांची नावे आपले मूल शिकत असलेल्या इयत्तेतील पुस्तकात आहे, ती त्यांना गृहवाटिकेत बघायला मिळाली तर त्या निमित्ताने त्यांची त्या झाडासी, फुलाशी, फळाशी जवळीक वाढेल आणि गृहवाटिकेची अर्थात झाडांची अर्थात पर्यावरणाशी त्यांची ओळख आणि जाण लहानपणापासूनच निर्माण होऊन ती वाढेल.
या कल्पनेनुसार गृहवाटिकेची आखणी केली तर दरवर्षी आपल्या गृहवाटिकेतील झाडे पण निरनिराळी असतील आणि त्यांची निगा राखल्यास मुलांचा (मुलगा/मुलगी) सक्रीय सहभाग असेल. गृहवाटिकेत आपण उपलब्ध जागेनुसार झाडे लावू, पण त्या निमित्ताने मुलांचे झाडांबद्दल प्रश्न येतील. त्या प्रश्नांची उत्तरे कदाचित ‘गुगल’मार्फत त्यांना मिळतीलही, पण प्रत्यक्षात ते झाड, फूल, फळ पहाण्याची उत्सुकता जागृत होईल. गृहवाटिकेमार्फत झाडं आणि पर्यावरणाशी ओळख जर घरच्याघरी आणि लहानपणापासून झाली तर त्याचे परिणाम दूरवर होतील. गृहवाटिका हे एक प्रभावी माध्यम ठरेल.
शहरामध्ये बऱ्याच मुलांना आणि मोठय़ांनासुद्धा खालील गोष्टी माहित नसतात. उदा. (१) केळी माहिती असतात, केळीची लोंगर किंवा घड असतो हे माहित असतं पण केळीच्या झाडाला एकदाच लोंगर/घड येतो. लोंगर/घड काढल्यानंतर ते झाड फळं देण्यासाठी निरुपयोगी ठरतं. (२) पपया/पपईच्या झाडामधे ‘नर’, ‘मादी’, दोन्ही नर-मादी एकत्र असे प्रकार असतात. जर लावलेल झाड ‘नर’ जातीच निघालं तर त्याला फळे धरत नाहीत. ‘नर’ जातीच्या झाडाला फुले येताना आधी एक दांडी येते आणि मग फुले येतात. ‘मादी’ झाडाची फुले झाडाच्या खोडाच्या अगदी जवळ येतात. (३) अळूची पाने भाजीसाठी काढताना खालची म्हणजे जुनी पाने काढायची असतात आणि नवीन येणारं पान तसच झाडावर ठेवायचं असतं. नवीन येणारं पान जर अपूर्ण वाढीच असेल तर ते आणि त्याच्या बाहेरील एक पान अशी दोन पानं झाडावर ठेवायची असतात. झाडावर एकावेळी चारपेक्षा जास्त पानं झाली तर खालची जुनी पानं निरुपयोगी होतात. ती हिरवी दिसली तरी शिजत नाहीत. (४) हिपवा चाफा किंवा कवठी चाफा यांना संध्याकाळीच वास येतो. (५) शोभेच्या वस्तूंच्या दुकानात ‘बांबू’ म्हणून विकलं जाणारं आणि शेकडोन किंमत असणारं झाड, मुळात बांबू नसून ‘ड्रेसेना’ या जातीचं असतं.
या आणि अशा अनेक गमती-जमती माहिती होण्यासाठी गृहवाटिका आणि मुलांचा अभ्यास याची सांगड आपण घालू शकलो तर ते एकमेकांना पूरकच होईल.
drnandini.bondale@gmail.com