hirvai– जून महिना उजाडला की नेमेचि येणाऱ्या पावसाबरोबरच सण आणि उत्सवांचीही सुरुवात होते. भारतीय समाज निसर्गपूजक मानला जातो. आपल्या सर्व सणांमागची मूळ प्रेरणा निसर्गाशी निगडित असतात. अक्षय्यतृतीयेला संपलेली सणांची मालिका जून महिन्यात पुन्हा सुरू होते. त्यातील पहिला सण असतो वटपौर्णिमा. या नावातच वड या निसर्ग चक्रातील एका महत्त्वाच्या वृक्षाचा नामोल्लेख आहे. ग्रीष्माच्या तडाख्याने सर्व वातावरणात उष्णतेचा अंमल असताना वडाखाली मात्र थंडगार सावली असते. आपल्याकडे धार्मिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिकदृष्टय़ा वडाच्या झाडाला फारच महत्त्वाचे स्थान आहे. वट सावित्रीच्या कथेत तर वडाला देवाचे स्थान देण्यात आले आहे. सध्या जागतिक तापमान वाढीने निसर्गचक्राचा समतोल बिघडलेला असताना वटवृक्षांचे पर्यावरणीय महत्त्वही अधोरेखित झाले आहे.
– वटवृक्षाचे शास्त्रीय नाव ‘फायकस बेंघालेसीस’ असे असून तो मोरेसी या कुलातील आहे. मूळ भारतीय असणाऱ्या या वृक्षाच्या अनेक प्रजाती भारतीय उपखंड, श्रीलंका, मध्य अमेरिका, दक्षिण अमेरिका, मेक्सिको, पेरुग्वे, पोर्तुगाल, बार्बाडोस, दक्षिण फ्लोरिडा, कॅरेबियन बेटे आदी ठिकाणी आढळून येतात.
– वटवृक्ष हा आकारमान, गुणधर्म आणि उपयोग या तिन्ही प्रकारांनी निसर्गाने दिलेली एक महान देणगी आहे. त्यामुळेच त्याला भारताच्या राष्ट्रीय वृक्षाचा दर्जा देण्यात आला आहे. या डेरेदार वृक्षाची सावली मोठी आणि घनदाट असते. भारतात ठिकठिकाणी मोठमोठे वटवृक्ष आहेत. आंध्रप्रदेशमधील थिम्मम्मा मरिमनू येथील वटवृक्षाचा विस्तार तब्बल दोन लाख पाच हजार ६७० चौरस फूट आहे. निअरचस हा अ‍ॅलेक्झेंडरचा अ‍ॅडमिरल नर्मदा नदीच्या काठी असलेला हा वटवृक्ष पाहून चकित झाला. या एका झाडाखाली त्याच्या सात हजार सैनिकांनी विसावा घेतला.
– भारतीय संस्कृती आणि अध्यात्मात वटवृक्षाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. या वृक्षाच्या पानांवर भगवान श्रीकृष्णाचा वास असतो, असे मानले जाते. पती-पत्नीचे नाते चिरंतन राहावे म्हणून महिला मनोभावे वटवृक्षाची पूजा करतात. या पूजेला सत्यवान सावित्रीच्या कथेचा आधार आहे. या वृक्षाच्या घनदाट सावलीमुळे अनेक मंदिरे यांच्या छायेखाली बांधलेली आढळून येतात. त्यामुळे मंदिराबरोबरच या वृक्षाशीही अनेकांचे भावनिक नाते जुळलेले असते.
– इंग्रजीमध्ये वटवृक्षास ‘बनयान ट्री’ असे म्हणतात. बनिया म्हणजे व्यापारी. पूर्वी गावोगावी फिरणारे व्यापारी या वृक्षाखाली बसून व्यवसाय करायचे. गावोगावी होणाऱ्या सभा, चर्चा, न्यायनिवाडा या वृक्षाच्या पारावर सुरू असायच्या. या वृक्षाभोवतीचे पार म्हणजे सामाजिक जीवनाचा अविभाज्य घटकच आहेत, असे म्हणता येईल.
– आयुर्वेदातही हा वृक्ष बहुगुणी म्हणून ओळखला जातो. कारण त्याची मुळे, खोड, साल, पाने, फळे, पारंब्या, बिया, चिक अनेक रोगांवर औषध म्हणून वापरले जाते. जीवाणूजन्य चर्मरोग, त्वचादाह, अतिसार, यकृताचे आजार, अल्सर, कृष्ठरोग, मूळव्याध, ताप, कान व नाकाचे आजार, गर्भाशयाचे विकार यावर वटवृक्षाची मात्र गुणकारी आहे. वटवृक्षाच्या सालीचे चूर्ण दुधाबरोबर घेतल्यास ते स्मरणशक्तीवर्धक आहे. पर्यावरणाच्या दृष्टीनेही हा वृक्ष खूपच महत्त्वाचा आहे. या वृक्षाची मुळे व जमिनीत जाणाऱ्या पारंब्या माती घट्ट धरून ठेवतात. त्यामुळे जमिनीची धूप होत नाही. या वृक्षावर अनेक पक्षी राहतात. वटवृक्ष त्यांना राहायला जागा देतोय, पुन्हा मुबलक खाद्यही पुरवितो. हेच पक्षी मग वटवृक्षाच्या बिजांचे वाहक ठरतात. पक्षांच्या पचनसंस्थेतून बाहेर पडणाऱ्या बिया ठिकठिकाणी अंकुरतात. त्यामुळेच शहरी भागात काँक्रिटच्या जंगलातही इमारतीच्या कोनाडय़ात वटवृक्ष अंकुरलेले आढळून येतात. या वृक्षाची पाने मोठी असतात. शिवाय कधीच पानगळ होत नाही. त्यामुळे बाराही महिने थंडगार सावली हे झाड देते. मोठय़ा प्रमाणात ऑक्सिजन पुरविणाऱ्या वृक्षांमध्ये वटवृक्षाची गणना होते. सध्याच्या प्रदूषणकारी वातावरण शुद्ध करण्याचे काम हा वृक्ष करतो. शहरी भागातील वटवृक्षे फुप्फुसे म्हणून काम करतात.
– आता शहरी भागात वेळ नाही म्हणून किंवा वेळ वाचविण्यासाठी म्हणून वडाच्या झाडाच्या फांदीचे पूजन करण्याचे फॅड वाढीस लागलेले आहे. धार्मिकदृष्टय़ाही ते योग्य नाहीच, शिवाय पर्यावरणीय दृष्टिकोनातूनही फांदीची पूजा अयोग्य ठरते. अशी पूजा करून वटवृक्षांची कत्तल होण्यास आपण अप्रत्यक्षरीत्या हातभार लावतो, हे कृपया जाणून घ्या. आपल्या या अनैसर्गिक कृतीमुळे पर्यावरणाचा समतोल बिघडतोय. वटपौर्णिमेच्या निमित्ताने वर्षांतून एकदा या बहुगुणी वृक्षाजवळ जाण्याची संधी निसर्गाने आपल्याला दिली आहे. त्याला अशा कर्मकांडाचे स्वरूप देऊ नका, असे कळकळीचे आवाहन आजच्या वटपौर्णिमेनिमित्त करावेसे वाटते.

Story img Loader