ठाकुर्लीतील बारा बंगला भागातील रेल्वेच्या हद्दीतील २५० झाडे खेळाच्या मैदानासाठी तोडण्याच्या रेल्वेच्या प्रस्तावास पालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समितीने विरोध करावा, अशी मागणी पर्यावरणप्रेमी ‘रानवाटा’ संस्थेतर्फे पालिका आयुक्त मधुकर अर्दड यांची भेट घेऊन करण्यात येणार आहे.
येथील २५० झाडे खेळाच्या मैदानासाठी तोडण्यात येणार आहेत. ही झाडे तोडण्याची परवानगी कल्याण-डोंबिवली पालिकेची वृक्ष प्राधिकरण समिती देते. दोन महिन्यांपासून समितीच्या बैठकीत हा विषय चर्चेला येत आहे. ‘लोकसत्ता’ने सतत ही झाडे तोडण्याच्या विरोधात भूमिका घेतली आहे. हे प्रकरण अंगलट येण्याच्या भीतीने समिती व प्रशासनाने वेळकाढूपणा करून स्थगित ठेवण्याचा प्रयत्न केला आहे.
गेल्या वर्षी या भागातील ६३ झाडे तोडली होती. या झाडे तोडण्याच्या विरोधात स्थानिक नगरसेवक श्रीकर चौधरी आक्रमक भूमिका घेत आहेत. काही सदस्य बहुमताच्या जोरावर चौधरी यांचे म्हणणे ऐकून घेत नाहीत.

जबाबदारी दोघांचीही
हरितपट्टे नष्ट होत आहेत. डोंबिवली भागातील हा एकमेव हरितपट्टा आहे. या भागाचे ती फुफ्फुसे आहेत. त्याचे संवर्धन पालिकेसह रेल्वेनेही करायला हवे. पक्ष्यांना हा एकमेव निवारा आहे. अनेक नागरिक या भागात शतपावलीसाठी येतात. त्यामुळे ही झाडे तोडण्यास पालिकेने परवानगी देऊ नये यासाठी आपण आयुक्त मधुकर अर्दड यांची भेट घेणार आहोत, अशी माहिती ‘रानवाटा’चे संचालक अनंत सोनावणे यांनी दिली.