ठाणे : केंद्रीय प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या नियमावलीनुसार ठाणे खाडीत गणेश मुर्ती तसेच पर्यावरणास हानीकारक वस्तू विसर्जन करू नये असे आदेश राष्ट्रीय हरित लवादाने दिले असतानाही गुरूवारी अनंत चतुर्दशीच्या दिवशी खाडीत गणेश मुर्ती विसर्जन झाल्याचे दिसून आले. तसेच शुक्रवारी खाडीतील पाण्यावर निर्माल्याचा कचरा दिसून येत होता. याबाबत पर्यावरणप्रेमींकडून नाराजी व्यक्त करण्यात आली.
हेही वाचा >>> कल्याण-डोंबिवलीत संरचनात्मक अभियंता संस्थेचे केंद्र; संरचनात्मक अभियंता माधव चिकोडी संस्थापक अध्यक्षपदी
ठाणे शहरात खाडी तसेच कृत्रिम तलावात गणेश मुर्तींचे विसर्जन करण्यात येते. परंतु पीओपीच्या मुर्तीमुळे जलस्त्रोतातील पाणी प्रदुषित होते. यामुळे पीओपीच्या मुर्ती, मखरासाठी वापरण्यात येणारे थर्माकोल, पर्यावरणास हानीकारक असलेल्या वस्तु खाडीत विसर्जित करण्यास केंद्रीय प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या नियमावलीनुसार बंदी घालण्यात आलेली आहे. यानंतरही ठाणे खाडीत गणेश मुर्तींचे विसर्जन सुरूच आहे. तसेच पर्यावरणपुरक विसर्जनासाठी उभारण्यात आलेल्या कृत्रिम तलावात विसर्जित होणाऱ्या मुर्तीचा मलबाही खाडीत टाकला जात आहे. या संदर्भात ठाण्यातील पर्यावरण प्रेमी रोहित जोशी यांनी राष्ट्रीय हरित लवादाकडे तक्रार दाखल केली होती. यावर झालेल्या सुनावणीत लवादाने पालिका प्रशासनाच्या कारभारावर ताशेरे ओढत केंद्रीय प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या नियमावलीनुसार २०२० मधील नियमांची अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले होते.
हेही वाचा >>> ठाणे : लिलाव बंदीमुळे कांदा महागला; घाऊक २ रुपयाने तर, किरकोळ बाजारात पाच रुपयाने दर वाढले
अनंत चतुर्दशीच्या दिवशी होणाऱ्या दहा दिवसांच्या गणेश मुर्ती विसर्जाच्या एक दिवस हा आदेश आल्याने पालिकेपुढे पेच निर्माण झाला होता. त्यावर पालिका काय उपाययोजना करते, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. असे असतानाच, गुरूवारी अनंत चतुर्दशीच्या दिवशी खाडीत गणेश मुर्ती विसर्जन झाल्याचे दिसून आले. तसेच निर्माल्यही खाडीत टाकण्यात आल्याचे दिसून आले. यामुळे खाडीतील पाण्यावर निर्माल्य तरंगताना दिसून येत होते. त्याचबरोबर थर्मोकोल, प्लास्टीक पिशव्या आणि गणरायासाठी वापण्यात आलेली आभुषणे असे खाडीत फेकण्यात आल्याचे दिसून येत होते. पारसिक रेतीबंदर, कोलशेत, साकेत या खाडी किनारी परिसरात हे चित्र दिसून आले.
ठाणे खाडीचे महत्त्व
ठाणे खाडीला नुकताच रामसर स्थळाचा दर्जा प्राप्त झाला आहे. जगातील एकूण रामसर स्थळांची संख्या २ हजार ४५३ इतकी आहे. यात भारतातील ७५ तर, महाराष्ट्रातील तीन स्थळांचा सामावेश आहे. त्यापैकी ठाणे खाडी एक आहे. ठाणे खाडीच्या दोन्ही बाजूच्या किनारी भागात कांदळवने आहेत. देशात आढळणाऱ्या एकूण खारफुटींपैकी २० टक्के प्रजाती येथे आढळतात.
ठाणे खाडीत गणेशमुर्तींचे विसर्जन झाले. तसेच पर्यावरणाच्या दृष्टिने हानीकारक वस्तू खाडीत टाकण्यात आल्या. केंद्रीय प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या मार्गदर्शन तत्त्वाचे उल्लंघन झाले आहे. याप्रकरणात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली जाईल. – रोहीत जोशी, याचिकाकर्ते.