ठाणे : महापालिका क्षेत्रात गेल्या काही महिन्यांपासून करोनाचा संसर्ग आटोक्यात असल्याचे चित्र असतानाच दुसरीकडे गेल्या दोन महिन्यांपासून शहरात साथी आजारांनी डोकेवर काढले आहे. साथ रोगांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पालिकेकडून विविध उपाययोजना करण्यात येत असल्या तरी आजारांची साथ कमी होताना दिसून येत नाही. ऑगस्ट महिन्यात संपुर्ण शहरात डेंग्युचे २ तर मलेरियाचे ७५ रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे शहराची आरोग्यचिंता वाढली आहे.

जुलै महिन्यात शहरात स्वाईन फ्लुचे रुग्ण आढळण्यास सुरुवात झाली. या रूग्ण संख्येत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. असे असतानाच याच महिन्यातच डेंग्यु आणि मलेरिया या साथीच्या आजारांनी डोके वर काढल्याचे समोर आले. संपुर्ण शहरात जुलै महिन्यात ६४ डेंग्यूचे संशयित रुग्ण आढळून आले असून त्यापैकी १४ रुग्णांना डेंग्युची लागण झाल्याचे निदान झाले होते. त्याचबरोबर शहरात मलेरियाचे ४७ रुग्ण आढळून आले होते. चिकनगुनियाचा एकही रुग्ण अद्याप आढळून आलेला नाही. त्यापाठोपाठ ऑगस्ट महिन्यात डेंग्यूची संशयित रुग्णसंख्या २३ आणि निश्चित निदान झालेली रुग्ण संख्या २ आहे. तर मलेरियाचे ७५ रुग्ण आढळून आले असून जुलै महिन्याच्या तुलनेत ऑगस्ट महिन्यात मलेरिया रुग्ण संख्येत वाढ झाल्याचे दिसून येत आहे.

हेही वाचा : कल्याण डोंबिवलीतील बकालपणा पाहून केंद्रीय मंत्र्यांचे आयुक्तांना खडेबोल

तसेच चिकनगुनियाची रुग्णसंख्या शून्य आहे. जुलै महिन्यात साथीच्या आजारांनी डोके वर काढल्यानंतर पालिकेच्या आरोग्य विभागाने साथ रोगांचा प्रादुर्भाव विविध उपाययोजना करण्यास सुरुवात केली होती. तरीही साथीच्या आजारांचा प्रादुर्भाव अद्याप आटोक्यात आल्याचे दिसून येत नाही. साथीचे आजारांचा प्रादुर्भाव रोखण्याकरीत प्रभावी उपाययोजना करण्यासाठी गृहभेटी देऊन एकूण ४४ हजार ८९६ घरांतील पाण्याची तपासणी केली आहे. यात ५५७ घरातील पाणी दूषित आढळून आले आहे.

याशिवाय, ६१ हजार ३१४ पिपांतील पाण्याची तपासणी करण्यात असून त्यात ६६२ पिंपात दूषित पाणी आढळून आले आहे. या दुषित पाण्यातील अळी पथकाने नष्ट केली आहे. तसेच ५० हॅण्डपंप, १० ट्रॅक्टर्स, ६ ई रिक्षा, १० बोलेरो वाहनांमार्फत दोन सत्रात २ हजार ७०८ ठिकाणी औषध फवारणी आणि धुरफवारणी करण्यात आली. तर १७ हजार ९४६ ठिकाणी मानवी पद्धतीने धूरफवारणी करण्यात आली. तसेच ४ ठिकाणी गप्पी मासे सोडण्याचे कार्यक्रम राबविण्यात आले असल्याची माहिती महापालिकेचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. भिमराव जाधव यांनी दिली.