ठाणे, कळवा तसेच मुंब्रा भागातील प्रत्येक नगरातील मैदानांमध्ये पूर्वी डबलबार असायचा आणि तिथे व्यायाम करण्यासाठी सकाळी व सायंकाळी तरुणाई जमायची. पण, कालांतराने अतिक्रमणामुळे मैदानांपाठोपाठ डबलबारही हद्दपार झाले असून या डबलबारची जागा आता खुल्या व्यायामशाळांनी घेतली आहे. शहरातील हरित जनपथ तसेच उद्यानांमध्ये अत्याधुनिक व्यायामाचे साहित्य महापालिकेमार्फत बसविण्यात आले असून तिथे व्यायाम करण्यासाठी पुरुषांसोबत महिलाही येत असल्याने खुल्या व्यायामशाळांचे शहरात नवे पर्वच सुरू झाले आहे.
पीळदार शरीरयष्टी कमविण्यासाठी पूर्वी तरुणाई डबलबारच्या साहाय्याने व्यायाम करायची. प्रत्येक नगरातील मैदानांमध्ये डबलबार असायचे आणि तिथे व्यायाम करण्यासाठी तरुणाई जमायची. यातूनच कब्बडी, खो-खो खेळाचे संघ तसेच गोंविंदा पथके उदयास येत होती. एकंदरीतच आता सिनेमाच्या प्रभावामुळे पीळदार शरीरयष्टी कमविण्याचे फॅड आले आहे. मात्र, पूर्वी सिनेमाचा फारसा प्रभाव नसला तरी व्यायामाचे फॅड होते. मात्र, गेल्या काही वर्षांत काही मैदानांवर अतिक्रमण झाले तर काही मैदानांवर गृहसंकुले तसेच अन्य प्रकल्प राबविण्यात आले आहेत. यामुळे या मैदानांमधील डबलबारची संस्कृती कालांतराने नामशेष पावली आणि कालांतराने खुल्या व्यायामशाळांची संस्कृती उदयास आली.
ठाणे महापालिकेने तीन हात नाका भागातील हरित जनपथ, लुईसवाडी भागातील हरित जनपथ, कचराळी तलाव, मानपाडा येथील यू आर सिटी कार्यालय परिसर, वृंदावन, कळवा येथील नक्षत्र उद्यान, मुंब्रा येथील अग्निशमन दल कार्यालयाजवळ खुल्या व्यायामशाळा उभारल्या असून तिथे व्यायामाचे अत्याधुनिक साहित्य बसविले आहे. त्यामध्ये सायकलिंग, एअर वाकॅर्स, रोईंग, चेस्ट प्रेस आदी साहित्यांचा समावेश असून त्याच्या साहाय्याने सर्व प्रकारचा व्यायाम करणे शक्य होत आहे. त्यामुळे सकाळी तसेच सायंकाळी फेरफटका मारण्यासाठी हरित जनपथ, उद्यानांमध्ये येणाऱ्या नागरिकांचा खुल्या व्यायामशाळांकडे ओढा वाढला असून त्यामध्ये ज्येष्ठ नागरिकांसोबतच तरुणाईही मोठय़ा संख्येने दिसून येते. विशेष म्हणजे, ताणतणाव, वाढलेले वजन यातून मुक्ती मिळण्यासाठी महिलाही खुल्या व्यायामशाळांकडे वळल्याचे चित्र पाहावयास मिळते. सध्या हिंदी चित्रपटांमुळे पीळदार शरीरयष्टी आणि सिक्स पॅक अॅब्झ बनविण्याचे फॅड वाढले असून त्यासाठी तरुणाईला व्यायामशाळा आकर्षित करू लागल्या आहेत. भरपूर व्यायाम आणि योग्य आहार यावर तरुणाई अधिक भर देताना दिसून येते. यातूनच अनेक ठिकाणी खासगी व्यायामशाळा उभ्या राहिल्या आहेत. व्यायामशाळेचे शुल्क, प्रशिक्षकाचे शुल्क आणि आहाराचा खर्च हा खर्च पेलवणे अनेकांना शक्य होत नाही. मात्र, महापालिकेच्या खुल्या व्यायामशाळांना कोणतेही शुल्क नसल्यामुळे त्यांच्यापुढे नवा पर्याय उपलब्ध झाला आहे. तसेच पैशांची बचत होत असल्याने अनेकजण खुल्या व्यायामशाळांचा पर्याय निवडू लागले आहेत.
नीलेश पानमंद
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा