डोंबिवली : कोपर पश्चिम रेल्वे स्थानकातील गर्दी वाढू लागली आहे. याठिकाणी मध्य रेल्वे प्रशासनाकडून सरकता जिना, नवीन पादचारी पूल उभारणीची कामे सुरू आहेत. या स्थानकाचे महत्व येत्या काळात वाढणार असल्याने कोपर भागातील काही राजकीय मंडळींनी रेल्वेच्या बांधकाम परवानग्या न घेता रेल्वे स्थानक भागात बेकायदा गाळ्यांची उभारणी केली आहे.
कोपर पश्चिम रेल्वे स्थानकाजवळील अनेक वर्षांची मोकळी जागा अचानक पत्रे ठोकून बंद करण्यात आली आहे. मोकळ्या जागेत एका राजकीय मंडळीच्या पंटरने रात्रीतून चार ते पाच गाळे रेल्वे स्थानक भागात बांधले आहेत. सुरुवातीला पत्र्यांनी गाळे बंदिस्त करायचे. तेथे उसाचा चरखा, लिंबू सरबत किंवा तत्सम दुकाने सुरू करायची. एकदा रेल्वे किंवा पालिकेकडून कारवाई होत नाही हे निदर्शनास आल्यावर ते गाळे विटा-सिमेंटची बांधकामे करून पक्की करून घ्यायची. अशी व्यूहरचना भूमाफियांनी आखली आहे. अशाच पद्धतीने डोंबिवली पश्चिम रेल्वे स्थानक भागात मागील चाळीस वर्षांपूर्वी स्थानिक वजनदार मंडळींनी सुमारे ५० ते ६० गाळे बांधले होते. हे गाळे नंतर अधिकृत असल्याचा दावा करत काही गाळेधारक न्यायालयात गेले होते. हे गाळे रस्ता रुंदीकरणात अडथळा ठरत होते. वेळोवेळी गाळेधारक न्यायालयीन स्थगिती आदेश आणून कारवाईत बाधा आणत होते.
हेही वाचा – डोंबिवलीत सोनारपाडा येथे मोटीराच्या धडकेत महिला गंभीर जखमी
तसाच प्रकार आता कोपर पश्चिम रेल्वे स्थानकाजवळ सुरू आहे. रेल्वे हद्दीत गाळे बांधण्याची कामे सुरू असताना रेल्वे स्थानक अधिकारी, रेल्वे सुरक्षा दलाचे जवान बघ्याची भूमिका घेत असल्याने प्रवासी आश्चर्य व्यक्त करत आहेत. डोंबिवली रेल्वे सुरक्षा दलाच्या अंतर्गत हा भाग येतो. या विभागाचे आता कोपर, ठाकुर्ली, डोंबिवली रेल्वे हद्दीत सुरू असलेल्या बेकायदा, गैरप्रकारांकडे लक्ष नसल्याचे समजते.
रेल्वे हद्दीतील गाळ्यांमध्ये दुकाने सुरू झाली की या ठिकाणाहून येजा करणे प्रवाशांना कठीण होणार आहे. या भागात काही प्रवासी दुचाकी, चारचाकी वाहने घेऊन लोकलने येणाऱ्या आपल्या घरातील सदस्याला घेण्यासाठी उभे राहत होते. त्यांची गाळ्यांमुळे अडचण झाली आहे. रेल्वे सुरक्षा बळाच्या स्थानिक अधिकाऱ्यांचे या महत्वपूर्ण विषयाकडे लक्ष नसल्याने रेल्वे सुरक्षा बळाच्या मुंबई विभागाच्या वरिष्ठांनी कोपर बेकायदा गाळे प्रकरणात लक्ष घालण्याची मागणी प्रवाशांकडून केली जात आहे. स्थानिक रेल्वे अधिकारी याविषयी उघडपणे काही बोलण्यास तयार नाहीत. आम्ही याप्रकरणी वरिष्ठांना कळविले आहे, असे त्यांनी सांगितले.