राजकीय वरदहस्तामुळे चालकांची प्रवाशांशी अरेरावी; वाहतूक पोलीस, उपप्रादेशिक परिवहन विभागाचे दुर्लक्ष

कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या परिवहन बससेवेच्या अभावामुळे नाइलाजाने रिक्षाची वाट धरणाऱ्या कल्याण पूर्वेकडील प्रवाशांना आता रिक्षाचालकांच्या अरेरावीलाही तोंड द्यावे लागत आहे. मीटरनुसार भाडे न आकारणे, तीनऐवजी पाच प्रवासी बसवणे असे व्यवसायातील गैरप्रकार करणाऱ्या रिक्षाचालकांपैकी काहीजण महिला प्रवाशांशी गैरवर्तन आणि शेरेबाजी करत असल्याच्याही तक्रारी आता पुढे येत आहेत.

कल्याण पूर्वेकडील भागातील लोकसंख्या साडेचार लाखांहून अधिक आहे. परंतु, येथील नागरिकांना अजूनही मूलभूत सुविधा उपलब्ध झालेल्या नाहीत. केडीएमटीची बससेवाही येथे नसल्यात जमा आहे. त्यातच वाहतूक पोलीस, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी हेदेखील या भागाकडे फिरकत नाहीत. या सर्व परिस्थितीमुळे या भागातील रिक्षाचालकांची मुजोरी वाढली आहे. त्यामुळेच प्रवाशांशी अरेरावी करणाऱ्या रिक्षाचालकांची आता महिला प्रवाशांशी तसेच पादचारी महिलांशी गैरवर्तन करण्यापर्यंत मजल गेली आहे. परंतु, या भागात पोलीस यंत्रणा नसल्यामुळे तक्रार कुणाकडे करायची, असा प्रश्न महिला प्रवाशांना पडतो. रात्रीच्या वेळी या भागातून जाणाऱ्या महिलांना आधी कुटुंबातील पुरुष सदस्याला स्थानक परिसरामध्ये बोलवून घ्यावे लागते. इतकी दंडेली वाढूनही पोलीस प्रशासन कोणतीही कारवाई करीत नसल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

राजकीय दबावतंत्राचा वापर

कोळसेवाडी भागातील रिक्षा थांब्यांवरील रिक्षा चालक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांचे राजकीय मंडळींशी संबंध आहेत. त्यामुळे या भागामध्ये पोलीस चौकी उभी राहू नये, केडीएमटीची वाहने धावू नयेत आणि या भागातील रिक्षा उभ्या करण्यासाठी काँक्रीटचा रस्ता व्हावा, यासाठी ही राजकीय मंडळी प्रयत्न करीत असतात. त्यासाठी स्थानिक आमदारांकडून भरघोस निधीही दिला जातो. या मंडळींच्या कार्यक्रमांना उपस्थिती लावून या मुजोरीला प्रोत्साहन देण्याचे कार्य येथील राजकीय मंडळींकडून होत असते.

कल्याण पूर्वेतील वाहतूक समस्या सोडवण्यासाठी वाहतूक पोलिसांच्या पथकांना तिथे पाचारण करण्याचे आदेश मी दिले आहेत.  पोलिसांची पथके तिथे जाऊन लवकरच परिस्थिती नियंत्रणात आणतील.

-संदीप पालवे, उपायुक्त, ठाणे वाहतूक शाखा

Story img Loader