डोंबिवली : डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानकातील सरकत्या जिन्याच्या पायऱ्या तुटल्या आहेत. तुटलेल्या पायऱ्यांवरून जाऊन प्रवाशांना काही इजा होऊ नये म्हणून रेल्वे प्रशासनाने पूर्व भागातील सरकता जिना प्रवाशांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. सरकता जिना बंद झाल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत.

डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानकाजवळ डाॅ. राॅथ रस्त्यावर रेल्वे स्थानकातील जिन्यावर आणि तेथून फलाटावर जाण्यासाठी प्रवाशांच्या सोयीसाठी सरकता जिना आहे. बहुतांशी प्रवासी रेल्वे स्थानकात झटपट जाण्यासाठी सरकत्या जिन्याचा वापर करतात. या सरकत्या जिन्याच्या पायऱ्या मागील काही दिवसांपासून तुटलेल्या अवस्थेत रेल्वे प्रशासनाला दिसत होत्या. या तुटलेल्या पायऱ्यांवरून प्रवास करत असताना प्रवाशांना काही इजा झाली तर अनर्थ घडेल. ही जोखीम टाळण्यासाठी रेल्वे प्रशासनाने सरकता जिना तुटलेल्या पायऱ्या दुरुस्त होईपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

अनेक प्रवासी नेहमीप्रमाणे या सरकत्या जिन्याजवळ जिन्यावर जाण्यासाठी येतात. पण जिना बंद असल्याचे पाहून ते बाजुच्या चढत्या जिन्यांवरून पायी जातात. व्याधी असलेले, ज्येष्ठ, वृध्द प्रवासी यांंना सरकता जिना, उदवाहन हा मोठा आधार असतो. या यंत्रणा बंद असल्या की त्यांचे सर्वाधिक हाल होतात. डोंबिवली पूर्वेतील सरकता जिना बंद झाल्याने अनेक प्रवासी नाराजी व्यक्त करत आहेत.

रेल्वे प्रशासनाने लवकरात लवकर या सरकतच्या जिन्याच्या तुटलेल्या पायऱ्या दुरुस्ती करून घ्याव्यात, अशी प्रवाशांची मागणी आहे. रेल्वे स्थानकातील उदवाहन, सरकते जिने बंद पडले की त्याची देखभाल करण्यासाठी संबंधित उत्पादक कंपन्यांना कळविले जाते. त्यानंतर त्या उत्पादक कंपन्यांचे देखभाल कर्मचारी येतात, असे रेल्वे अधिकाऱ्याने सांगितले. या सरकत्या जिन्याच्या तुटलेल्या पायऱ्यांसंदर्भात अनेक प्रवाशांनी उपनगरीय रेल्वे प्रवासी महासंघाच्या अध्यक्षा लता अरगडे यांच्याकडे तक्रारी केल्या आहेत. हा विषय रेल्वेच्या वरिष्ठांना कळविण्याची मागणी प्रवाशांनी केली आहे.