ठाणे : ठाणे रेल्वे स्थानकात सोमवारी सकाळी फलाट क्रमांक पाच-सहावरील सरकता जिना अचानक बंद पडला. त्याचा परिणाम स्थानकातील एका अरूंद पादचारी पूलावर येऊन पादचारी पूलाच्या जिन्यावर प्रवाशांची चेंगराचेंगरी सदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. दुपारी उशीरापर्यंत सरकता जिना दुरुस्तीचे काम रेल्वे प्रशासनाकडून सुरू होते.
ठाणे रेल्वे स्थानकातून दिवसाला सुमारे पाच लाख प्रवासी ये-जा करत असतात. स्थानकातील फलाट क्रमांक पाचवरून मुंबईहून कल्याण-कर्जत, कसारा येथे जाणाऱ्या उपनगरीय रेल्वेगाड्या थांबत असतात. तर फलाट क्रमांक सहावर कल्याणहून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या उपनगरीय रेल्वेगाड्या थांबत असतात. त्यामुळे या फलाटांवर दररोज प्रवाशांची गर्दी होत असते.
सोमवारी सकाळी ८.३० वाजेच्या सुमारास फलाट क्रमांक पाच आणि सहामध्ये असलेला एक सरकता जिना तांत्रिक बिघाडामुळे अचानक बंद पडला होता. त्यातच या दोन्ही फलाटावर एकाचवेळी उपनगरीय रेल्वेगाड्या थांबल्या. त्यामुळे रेल्वे गाड्यांतून उतरलेल्या प्रवाशांची आणि फलाटावर येणाऱ्या प्रवाशांची मधल्या अरुंद पूलावरील जिन्यावर प्रचंड गर्दी झाली होती. चेंगराचेंगरीची स्थिती निर्माण झाल्याचे प्रवाशांचे म्हणणे होते. सुदैवाने या घटनेत कोणालाही दुखापत झाली नाही. या घटनेची माहिती कार्तिक गोपालन सारख्या जागृत प्रवाशाने ट्विटरवर मध्य रेल्वे आणि रेल्वेमंत्री यांना टॅग करत ट्वीट केल्यानंतर रेल्वे प्रशासनाने सरकत्या जिन्याच्या दुरूस्तीचे काम हाती घेतले. दुपारनंतरही दुरूस्तीचे काम सुरू होते.