डोंबिवली – डोंबिवली रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक तीन आणि चारवरील कल्याण बाजुकडील सरकत्या जिन्याचे काम मागील तीन महिन्यांपासून रखडले आहे. या फलाटावर कल्याण बाजुकडे उतरणाऱ्या प्रवाशांना फलाटाच्या मध्यभागी येऊन तेथून जिन्याने जावे लागते. सरकत्या जिन्याच्या रखडलेल्या कामामुळे प्रवाशांना सकाळ, संध्याकाळ गर्दीच्या वेळेत त्या भागातून फिरणे अवघड होते.

तीन महिन्यापूर्वी डोंबिवली रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक तीनवर कल्याण बाजुकडे घाईघाईने सरकता जिना उभारणीसाठी या भागातील पादचारी जिना काढून टाकण्यात आला. याठिकाणी खड्ड्याची खोदाई करण्यात येऊन चारही बाजुने पत्रे लावून फलाटावरील सरकता जिना उभारणीचा भाग बंदिस्त करण्यात आला. या पत्र्यांमुळे पादचाऱ्यांना या अरुंद जागेतून जाताना कसरत करावी लागते. सकाळच्या वेळेत मुंबईला जाणारी लोकल पकडताना आणि मुंबईकडून कर्जत, कसाराकडे जाणाऱ्या लोकल डोंंबिवली रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक तीन आणि चारवर आल्या की सरकत्या जिन्याच्या कामाच्या ठिकाणी अरुंद जागेत गर्दी उसळते.

हे काम लवकर पूर्ण करून प्रवाशांना दिलासा देण्याची मागणी प्रवासी, प्रवासी संघटना रेल्वे प्रशासनाकडे करत आहेत. परंतु, रेल्वे प्रशासन त्याकडे लक्ष देत नसल्याच्या प्रवाशांच्या तक्रारी आहेत. मध्य रेल्वेच्या इतर रेल्वे स्थानकांप्रमाणे सर्वाधिक प्रवासी गर्दीचे रेल्वे स्थानक म्हणून डोंबिवली रेल्वे स्थानक ओळखले जाते. फलाटावर प्रवाशांना मुक्त संचार करता यावा म्हणून फलाटावर मध्यभागी असलेली उपहारगृह, पुस्तक विक्रीची दुकाने फलाटांच्या एका बाजुला स्थलांतरित करण्यात आली आहेत.

ब्लाॅक अभावी रखडले काम

सरकत्या जिन्याचे काम का रखडले आहे, याविषयी कोणीही रेल्वे अधिकारी स्पष्ट आणि उघडपणे बोलण्यास तयार नाही. मात्र, रेल्वेतील कामाच्या ठिकाणच्या विश्वसनीय सुत्रांनी सांगितले, की सरकत्या जिन्याच्या कामासाठी आवश्यक असलेली अवजड यंत्रणा डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानकाजवळील वाहनतळ जागेत आणून ठेवण्यात आली आहे. ही यंत्रणा रेल्वे स्थानकाजवळ वाहनतळ जागेतून आणण्यासाठी रात्रीतून काम करावे लागणार आहे. यासाठी रेल्वे मार्ग काही तास बंद ठेवावा लागणार आहे. हा रेल्वे मार्ग बंद ठेवण्यासाठीचा ब्लाॅक रेल्वे प्रशासनाकडून मिळत नसल्याने सरकत्या जिन्याचे काम रखडले आहे. हा ब्लाॅक कधी मिळेल याविषयीची खात्री नाही. ब्लाॅक मिळाल्यानंतर हे काम पूर्ण होईल, असे सुत्राने सांगितले.

डोंबिवली रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक तीन व चारवरील सरकत्या जिन्याच्या रखडलेल्या कामाविषयी माहिती घेतो आणि हे काम रखडले असेल तर संबंधितांना त्याविषयी कळविण्यात येईल.-डाॅ. स्वप्निल नीलामुख्य जनसंपर्क अधिकारी, ,मध्य रेल्वे.

रेल्वे प्रशासनाला तिकिटाच्या माध्यमातून सर्वाधिक महसूल देणाऱ्या डोंबिवली रेल्वे स्थानकातील प्रवाशांचा प्रत्येक गोष्टीत अंतच पाहायचा का, असे रेल्वेने ठरवले आहे की काय असाच प्रश्न या रेल्वे स्थानकातील रखडलेली कामे, वाढते प्रवासी अपघात पाहता पडतो. रखडलेल्या सरकत्या जिन्याचे काम रेल्वे प्रशासनाने पावसाळ्यापूर्वी पूर्ण करावे.- लता अरगडे,अध्यक्षा, उपनगरीय रेल्वे प्रवासी महासंघ.