घोडबंदर येथील खेवरा सर्कल भागात असलेल्या विद्युत मनोऱ्यावर मंगळवारी रात्री झालेल्या दुर्घटनेनंतर येथील रहिवासी महावितरण कंपनी विरोधात आक्रमक झाले आहेत. बुधवारी सकाळी येथील रहिवाशांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांकडे हा मनोरा हटविण्याची मागणी केली आहे. यापूर्वीही हा विद्युत मनोरा हटविण्याचे पत्र महावितरण कंपनीकडे दिले होते. परंतु महावितरण कडून कोणतीही भूमिका घेतली जात नसल्याचा आरोप येथील रहिवाशांनी केला.
हेही वाचा >>> डोंबिवली : शिळफाटा रस्ता बाधितांचे मंगळवार पासून काटई येथे बेमुदत धरणे आंदोलन
खेवरा सर्कल येथील व्हॅली टॉवर भागात महावितरण कंपनीचा विद्युत मनोरा आहे. मंगळवारी रात्री या मनोऱ्याच्या उच्चदाब वाहिनीमध्ये तांत्रिक बिघाड होऊन विद्युत वाहिनी तुटून ती येथील गृहसंकुसाजवळ पडली. सुदैवाने त्यावेळेस परिसरात कोणीही नसल्याने मोठी दुर्घटना टळली. या घटनेची माहिती गृहसंकुलाच्या सदस्यांनी महावितरण कंपनीला दिल्यानंतर कंपनीचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी परिसरातील भाग प्रतिबंधित केला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून येथील गृहसंकुलातील रहिवाशांनी हा मनोरा संकुलाच्या परिसरातून हटविण्याची मागणी करत आहेत. परंतु महावितरणने त्याकडे दुर्लक्ष केल्याचे येथील नागरिकांनी सांगितले. बुधवारी सकाळी गृहसंकुलातील सदस्यांनी महावितरणच्या कर्मचाऱ्यांना रोखले. तसेच त्यांच्याकडे हा मनोरा हटविण्याची मागणी केली. भविष्यात या मनोऱ्यामुळे दुर्घटना घडल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी महावितरणची असेल असेही नागरिक म्हणाले.