कल्याण – कल्याण पश्चिमेतील वायलेनगर भागात एका गृहनिर्माण संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी रहिवाशांच्या खोट्या स्वाक्षऱ्या करून बनावट कागदपत्र तयार केली. ती कागदपत्र येथील दुय्यम निबंधक कार्यालयात दाखल करून त्या बनावट कागदपत्रांच्या आधारे गृहनिर्माण सोसायटी स्थापन करणाऱ्या सोसायटी पदाधिकाऱ्यांविरुद्ध एका सोसायटी सद्स्याच्या तक्रारीवरून बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कल्याण पश्चिमेतील वायलेनगरमधील नानक सोसायटीत हा प्रकार घडला आहे. या सोसायटीतील एक सेवानिवृत्त सदस्य कश्मिरा सिंग एन. एस. बडवाल (७५, रा. नानक सोसायटी) यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी शंकर बी. काटकर, नरेश श्रावणकुमार साहू, सुनील हरणे (रा. नानक सोसायटी, वायलेनगर) यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
हेही वाचा – कल्याणमध्ये दोन मुलींची वेश्या व्यवसायातून सुटका
गेल्या वर्षी जानेवारीपासून ते तक्रार दाखल होईपर्यंतच्या काळात हा प्रकार घडला आहे. पोलिसांनी सांगितले, तिन्ही आरोपींनी सोसायटी स्थापन करण्यासाठी सोसायटीतील सदस्यांना विश्वासात न घेता ते सोसायटी स्थापन करण्यासाठी सकारात्मक आहेत, असे दाखवून त्यांच्या बनावट स्वाक्षऱ्या संमती पत्रावर केल्या. बनावट कागदपत्र तयार करून, काही कागदपत्रांमध्ये फेरफार करून ती कागदपत्रे कल्याणमधील दुय्यम निबंधक कार्यालयात सोसायटी स्थापन करण्यासाठी दाखल केली. दस्त नोंदणी अधिकाऱ्यांनी त्या कागदपत्रांची पडताळणी न करता त्या कागदपत्रांचे नोंदणीकरण करून सोसायटी स्थापन झाल्याचे प्रमाणपत्र मिळविले. या सगळ्या प्रकरणात सोसायटी सदस्यांची फसवणूक झाल्याने एक जागरूक सदस्य कश्मिरा सिंग बडवाल यांनी पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे.
दरम्यान, आम्हाला कागदपत्र पडताळणीचे अधिकार नाहीत, असा दावा करत कल्याण पश्चिमेतील दुय्यम निबंधक कार्यालयात वादग्रस्त कागदपत्रांची दस्त नोंदणी करण्यात येत असल्याच्या तक्रारी मुद्रांक विभागाच्या वरिष्ठापर्यंत गेल्या आहेत.