डोंबिवली – डोंंबिवली एमआयडीसीतील एका कुटुंबाला युरोपातील पर्यटन महागात पडले आहे. हे कुटुंब युरोपात फिरण्यासाठी जाताच चोरट्याने या कुटुंबीयांच्या घरात चोरी करून तिजोरीतील पाच लाख ४५ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने, रोख रक्कम चोरून नेली आहे.

सुनील मधुकर पाटणकर यांच्या मिलापनगरमधील बंंगल्यामध्ये चोरट्याने चोरी केली आहे. या चोरीप्रकरणी सुनील पाटणकर यांचे नातेवाईक राजेंद्र देवराम चौधरी यांनी मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे.

हेही वाचा – ठाणे: २३ बेकायदा माध्यमिक शाळा बंद, बेकायदा ठरवल्यानंतरही शाळा सुरू ठेवल्याने गुन्हा दाखल

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सुनील मधुकर पाटणकर हे आपल्या कुटुंंबीयांसमवेत युरोपमध्ये पर्यटनासाठी गेले आहेत. पाटणकर यांच्या मिलापनगरमधील बंंगल्यावर पाळत ठेऊन असलेल्या चोरट्याने या बंंगल्यात कोणी राहत नसल्याचा अंदाज घेतला. शनिवारी मध्यरात्रीच्या दरम्यान चोरट्याने सुनील पाटणकर यांच्या बंंगल्याच्या स्वयंपाक घराच्या लोखंडी जाळ्या कटरने तोडल्या. या खिडकीतून चोरट्याने घरात प्रवेश केला. त्याने घरातील शय्या गृहातील लोखंडी कपाटाचे कुलुप तोडले. तिजोरी उघडून त्यामधील सोन्याचा ऐवज, रोख रक्कम असा एकूण पाच लाख ४५ हजार रुपयांचा ऐवज चोरट्याने चोरून नेला.

हेही वाचा – भिवंडीत कापड गोदामाला भीषण आग

पाटणकर यांच्या घरात चोरी झाल्याचा प्रकार दुसऱ्या दिवशी सकाळी शेजाऱ्यांना समजला. ही माहिती तातडीने त्यांचे नातेवाईक चौधरी यांना देण्यात आली. युरोप पर्यटनावर असलेल्या पाटणकर यांनाही माहिती देण्यात आली. मानपाडा पोलिसांना चौधरी यांनी माहिती दिल्यानंतर पोलीस घटनास्थळी आले. त्यांनी या चोरीप्रकरणी पंचनामा करून अज्ञात चोरट्या विरुद्ध गुन्हा दाखल केला. सीसीटीव्ही चित्रणाच्या आधारे पोलिसांनी चोरट्याचा शोध घेण्याची मागणी नागरिकांंनी केली आहे. गेल्याच आठवड्यात एमआयडीसीत चोरी झाली होती. गेल्या दोन वर्षांपासून डोंबिवली एमआयडीसीतील निवासी विभाग, कंपन्यांमध्ये चोऱ्यांचे प्रमाण वाढल्याने रहिवासी, उद्योजक चिंताग्रस्त आहेत.

Story img Loader