ठाणे : नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने अति धोकादायक इमारतींचा पाणी आणि वीजपुरवठा तात्काळ खंडित करावा आणि या इमारती तातडीने रिकाम्या कराव्यात, असे आदेश ठाणे महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी दिले आहेत. पावसाळापूर्व तयारीचा आढावा घेण्यासाठी महापालिका आयुक्तांनी नुकतीच बैठक घेतली. रिक्त करायच्या अति धोकादायक इमारती, त्यातील अडचणी, पर्यायी व्यवस्था, संक्रमण शिबिरे याबाबत चर्चा झाली.
ठाणे महापालिका क्षेत्रात एकूण ८६ अति धोकादायक इमारती आहेत. त्यातील ३७ इमारती रिकाम्या करण्यात आल्या आहेत. तर, ४९ इमारतींमध्ये नागरिक राहत आहेत. या ४९ अति धोकादायक इमारती तातडीने रिकाम्या करण्याचे निर्देश बांगर यांनी दिले आहेत. या इमारत अति धोकादायक असल्याचे फलक लावावेत. या इमारतींमधील नागरिकांनी तात्काळ पर्यायी जागेत स्थलांतरित व्हावे. अति धोकादायक अधिकृत इमारतींमधील रहिवाशांची पर्यायी व्यवस्था होत नसल्यास, तसेच त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून आवश्यकता भासल्यास, तात्पुरती पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून देण्याचा महापालिकेचा प्रयत्न आहे, असेही त्यांनी सांगितले.
अधिकृत इमारतीतील काही कुटुंबांची पर्यायी व्यवस्था करणे आवश्यक असल्यास, स्थानिकांना शक्यतो मान्य होईल असा पर्याय देण्याचा प्रयत्न करावा. म्हणजे त्या कुटुंबांची कमीत कमी गैरसोय होईल. अति धोकादायक (सी १ ) आणि धोकादायक (सी २ अ) या दोन्ही प्रकारातील इमारतींचा पाणी आणि वीजपुरवठा तात्काळ खंडित करावा. जुन्या किंवा मोडकळीस आलेल्या इमारतींबाबत पावसाळय़ापूर्वी करावयाच्या कार्यवाहीबद्दल नगरविकास विभागाने दिलेल्या सूचनांचे तंतोतंत पालन करावे. यात अजिबात दिरंगाई होऊ नये, असे निर्देशही त्यांनी दिले आहेत.