ठाणे: मालवाहतूकदारांनी मंगळवारी रात्री उशिरा संप मागे घेण्याचा निर्णय घेतला. असले तरी ठाणे शहरातील अनेक पेट्रोल पंपवर बुधवारी सकाळी इंधन पुरवठा करणाऱ्या गाड्या दाखल झाल्या नव्हत्या. त्यामुळे सकाळी बाहेर पडलेल्या नोकरदारांना पेट्रोल आणि डिझेल तुटवड्याचा फटका बसला. दुपारनंतर स्थिती सुरळीत होईल अशी माहिती पेट्रोल पंप चालकांनी दिली.
भारतीय न्याय संहितेमध्ये ‘हिट अँड रन’ प्रकरणात १० वर्षांचा तुरुंगवास आणि सात लाख रुपयांचा दंड अशा शिक्षेची तरतूद आहे. कठोर शिक्षेची तरतूद असलेल्या नवीन कायद्याविरोधात देशभरातील मालवाहतुकदारांनी संप पुकारला होता. केंद्र सरकारने तरतुदी मधून ट्रॅक वाहतूकदारांना तूर्त अभय दिले. त्यामुळे हा संप मागे घेण्यात आला आहे. असे असले तरी ठाणे शहरातील सर्वच पेट्रोल पंप केंद्रावर इंधनाने तळ गाठला होता. शहारातील प्रत्येक पेट्रोल पांपवर किमान १० हजार ते ३० हजार पेट्रोल दररोज लागते.
हेही वाचा… काटई-बदलापूर रस्त्यावर वाहन चालकाला लुटले; वाहनासह चोरटे फरार
सोमवारी रात्री आणि मंगळवारी सकाळी नागरिक पेट्रोल भरण्यासाठी बाहेर पडले होते. त्यामुळे बुधवारी पेट्रोल पंप वर शिल्लक साठाही उपलब्ध नव्हता. मंगळवारी रात्री उशिरा शहरातील जवळपास सर्वच पेट्रोल पंप बंद अवस्थेत होती. त्यामुळे बुधवारी सकाळी कामानिमित्त बाहेर पडलेला नोकरदारांना पेट्रोल उपलब्ध होऊ शकला नाही. सकाळी ११ नंतर काही पेट्रोल पंप वर इंधन पुरवठा करणारे टँकर दाखल झाले. परंतु इंधन साठा करण्यास बराच वेळ लागत होता. तर काही पेट्रोल पंप चालक टँकरच्या प्रतिक्षेत होते. त्यामुळे दररोज कामामध्ये असणारे कर्मचारी बुधवारी बसून अवस्थेत होते. दुपार नंतर बहुतांश पेट्रोल पंप सुरू होतील असे पेट्रोल पंप चालकांचे म्हणणे आहे.