लोकसत्ता प्रतिनिधी
अंबरनाथ: एकीकडे गणेशोत्सवाची तयारी सुरू असतानाच उल्हासनगर आणि अंबरनाथ शहरात पाणी प्रश्न गंभीर रूप धारण करत आहे. दोन दिवसांपूर्वी उल्हासनगर महापालिकेत स्थानिक आमदारांकडून प्रशासनाची पाणी प्रश्नावरून कान उघडणी केल्यानंतर बुधवारी अंबरनाथमध्ये भल्या पहाटे महिलांनी पाणी वितरण कार्यालयात जाऊन संताप व्यक्त केला. पुरेशा दाबाने आणि सुरळीत पाणी पुरवठा होत नसल्याने महिलांनी कार्यालयाबाहेर गोंधळ घातला. त्यामुळे गणेशोत्सवापूर्वी पाणी प्रश्न गंभीर होत असल्याने येत्या काळात ही परिस्थिती भीषण होण्याची शक्यता आहे.
यंदाच्या वर्षात पाऊस उशीराने सुरू झाला असला तरी जुलै महिन्यानंतर पावसाचा जोर वाढल्याने जलस्त्रोत भरून वाहू लागले होते. ऑगस्ट महिना काही अंशी कोरडा गेला. मात्र एप्रिल २०२४ पर्यंत पुरेल इतका पाणीसाठा ठाणे जिल्ह्यातील जवळपास सर्वच जलस्रोतांमध्ये उपलब्ध आहे. दुसरीकडे वितरण व्यवस्थेतील त्रुटींमुळे पाणी पुरवठा कमी दाबाने होत असल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. दोनच दिवसांपूर्वी उल्हासनगर महापालिका मुख्यालयामध्ये पाणीपुरवठा संदर्भात आयोजित बैठकीत लोकप्रतिनिधींनी अधिकाऱ्यांची कान उघडणी केली. स्थानिक आमदार गणपत गायकवाड यांनी अधिकाऱ्यांना फैलावर घेतले. पाणीपुरवठ्यातील त्रुटींवर बोट ठेवत गेल्या काही महिन्यांपासून अधिकारी पळ काढत आहेत.
आणखी वाचा-प्रस्तावित टोल दरवाढी विरोधात मनसेचे आंदोलन
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, महावितरण आणि महापालिका यांनी समन्वय ठेवत पाणीपुरवठा सुरळीत होईल याची काळजी घेण्याचे काही महिन्यांपूर्वी झालेल्या बैठकीत ठरले होते. त्यानंतरही उल्हासनगर शहरातील पाणीपुरवठा सुरळीत होऊ शकलेला नाही. उल्हासनगरमध्ये ही परिस्थिती असताना शेजारच्या अंबरनाथ शहरातही नागरिकांना कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. बुधवारी अंबरनाथ पश्चिम येथील पाणीपुरवठा केंद्रावर महिलांनी धाव घेत गोंधळ घातला. गेल्या काही दिवसांपासून अंबरनाथ शहराच्या जावसई, खामकरवाडी, कमलाकर नगर, गणेश नगर, बुवापाडा, भास्कर नगर या भागांमध्ये दोन दिवसाआड पाणी येत आहे. चार ते पाच दिवस पाणी पुरवठा न झालेल्या खामकरवाडी भागातील संतप्त महिलांनी बुधवारी सकाळी सहा वाजता पाणी पुरवठा केंद्रावर जात संताप व्यक्त केला. एकीकडे गणेशोत्सवाची तयारी सुरू असताना पाणीपुरवठ्यामध्ये त्रुटी होत असल्याने येत्या काळात पाणी प्रश्न गंभीर होण्याची भीती व्यक्त होत आहे.