महात्मा फुले मार्गावर दुतर्फा पार्किंग; रस्त्याच्या मध्यभागापर्यंत वाहने उभी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वाहतूक कोंडीची समस्या मिटावी यासाठी वाहतूक विभागातर्फे नागरिकांना सम-विषम पार्किंगचे नियम लागू करून पार्किंगची सोय उपलब्ध करून देण्यात आली. मात्र तरीही नौपाडा परिसरातील महात्मा फुले मार्गावर मात्र रस्त्याच्या दुतर्फा वाहनांची पार्किंग होत असल्याने सकाळच्या वेळी वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे. विशेष म्हणजे रस्त्याच्या मध्यभागापर्यंत दोन्ही बाजूस मोठी वाहने आडव्या पद्धतीने उभी केलेली असल्याने वाहतूक विभागाने लागू केलेल्या सम-विषम पार्किंगचे नियम नागरिकांकडून पाळले जात नसल्याचे दिसून येत आहे. एकीकडे मोठय़ा रस्त्यावरील वाहतूक कोंडी सुरळीत करण्यासाठी वाहतूक विभाग तत्पर असला तरी नागरिकांच्या दैनंदिन व्यवहारासाठी उपयोगात येणाऱ्या लहान रस्त्यांकडे मात्र वाहतूक विभागाचे सपशेल दुर्लक्ष होताना दिसत आहे.

नौपाडा परिसरातील महात्मा फुले मार्गावर नागरिकांची वर्दळ असते. पूर्वी दुहेरी वाहतुकीमुळे वाहतूक कोंडी होत असल्यामुळे सध्या हा मार्ग एकेरी वाहतुकीसाठी वापरला जातो. ठाणे महानगरपालिकेच्या वतीने ‘पे अ‍ॅण्ड पार्क’चे फलक या रस्त्यावर लावण्यात आले आहेत. रस्त्याच्या दुतर्फा सम-विषम दर्शवणारे फलक अस्तित्वात आहेत. असे असूनही अनेकदा रस्त्याच्या दुतर्फा वाहने उभी करत असल्यामुळे सम-विषम पार्किंगच्या नियमांचे नागरिकांकडून उल्लंघन होत असताना दिसत आहे. अनेकदा चारचाकी वाहने रस्त्याच्या मध्यभागापर्यंत उभी केल्याने या रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या वाहनांना त्यातून मार्ग काढणे कठीण जाते. या परिसरातील पदपथही दुकानांच्या गर्दीने व्यापलेले असल्याने नागरिकांना रस्त्यावरूनच प्रवास करावा लागतो. रस्त्याच्या अध्र्यापर्यंत आलेल्या वाहनांमधून प्रवास करताना समोरून एखादे वेगाने वाहन आल्यास या ठिकाणी अपघात होण्याची शक्यता आहे. अनेकदा चारचाकी वाहने तीन ते चार तास एकाच ठिकाणी उभी असतात. ती वाहने वाहतुकीसाठी मोठा अडथळा ठरतात. रस्ता रुंद असला तरी अशा प्रकारच्या दुहेरी पार्किंगमुळे वाहतूक कोंडी होत आहे. याच रस्त्यावर बेडेकर शाळेचे प्रवेशद्वार असल्याने सकाळी शाळा भरण्याच्या वेळी आणि सायंकाळी शाळा सुटल्यावर या परिसरात वाहतूक कोंडी होते. गोखले रोड या मुख्य रस्त्यापासून आतील भागातील हा रस्ता असला तरी लहान रस्त्यावर पार्किंगसाठी महापालिका परवानगी कशी देते, असा सवाल दररोज पायी प्रवास करण्याऱ्या नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. नियम मोडून वाहने उभी करणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यासाठी टोइंग व्हॅन परिसरात कधी तरी फिरत असली तरी लहान रस्त्यावर पार्किंग नको, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे.

दररोज सकाळी ये-जा करण्याचा हा रस्ता आहे. सम-विषम पार्किंग असली तरी दररोज रस्त्याच्या दुतर्फा पार्किंग असतेच. चुकीच्या पद्धतीने वाहने उभी करणाऱ्या वाहनांवर वाहतूक विभागाची कारवाई होत असली तरी कायमचा तोडगा निघत नाही. नियम मोडून वाहने उभी करणाऱ्या नागरिकांनीही याचे भान राखायला हवे.

– भारती जोशी, स्थानिक नागरिक, ठाणे

प्रत्यक्ष स्थळी भेट देऊन या भागाची समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न केला जाईल. नागरिकांच्या प्रवासाला अडथळा होत असल्यास या संदर्भात कायम तोडगा निघण्यासाठी वाहतूक विभागातर्फे सातत्याने कारवाई होत राहील.

– संदीप पालवे, उपायुक्त ठाणे वाहतूक शाखा